Kamptee Election Result 2024 : कामठीत चंद्रशेखर बावनकुळे विजयाच्या मार्गावर
Kamptee Election Result 2024 : भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांचापराभव करून मतदारसंघावर झेंडा फडकवण्याच्या तयारीत आहेत. संभाव्य विजयामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांचा राजकीय दबदबा आणखी वाढणार आहे. तर सुरेश भोयर पराभवाच्या छायेत आहेत.
नागपूर जिल्हा परिषदेच्या राजकारणापासून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. 2004 साली ते पहिल्यांदा भाजपचे आमदार झाले आणि 2009 तसेच 2014 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका तेली कुटुंबात जन्मलेल्या बावनकुळे यांनी अल्पावधीतच प्रचंड मोठा जनसंपर्क निर्माण केला. ते विज्ञान शाखेचे उच्च पदवीधर आहेत.

2019 साली कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे त्यांच्या राजकीय कारकीर्दीला स्वल्पविराम लागला. बावनकुळे यांची उमेदवारी कापण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष होता. मात्र बावनकुळे यांनी कुठेही आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त होऊ दिली नाही. त्यांच्या या संयमाचे फळ देखील पक्षाने त्यांना दिले आणि नवनव्या संधी त्यांना देण्यात आल्या.
पुढे चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेवर निवडण्यात आले तसेच भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा ही त्यांच्याकडे देण्यात आली. बावनकुळे यांच्यावर देण्यात आलेल्या या जबाबदाऱ्यांच्या मागे देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद त्यांनी अत्यंत जबाबदारीने सांभाळले आणि महाराष्ट्रभर झंझावती दौरे काढले. प्रत्येक जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांची फळी त्यांनी उभारली.
2019 साली केलेली चूक सुधारत भाजपने कामठी मतदारसंघात पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली. त्यांचा सामना काँग्रेसचे सुरेश भोयर यांच्याशी झाला. सुरेश भोयर हे चंद्रशेखर बावनकुळे यांचे शिष्य आहेत. आपल्या राजीनामामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या जागेवर बावनकुळे यांनीच भोयर यांना निवडून आणले होते. मात्र नंतर त्यांनी काँग्रेसची घरोबा केला.
विशेषतः माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्याशी भोयर यांचे संबंध खूप चांगले होते. मात्र आता अशोक चव्हाण स्वतःच भाजपमध्ये दाखल झाले आहेत आणि भोयर काँग्रेसमध्येच राहिलेले आहेत. 2019 साली बावनकुळे यांचे तिकीट कापण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली. आणि सुरेश भोयर यांचा 11000 मतांनी पराभव झाला होता. नागपूर जिल्ह्यातील राजकीय वातावरणाचा अंदाज घेत भोयर यांनी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्याशी जुळवून घेतले.
मतदारसंघात आतापर्यंत केलेली विकास कामे आणि जनसंपर्क यांच्या जोरावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या राजकीय शिष्याला आसमान दाखवले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रूपाने भाजपचा आणखी एक तगडा नेता विधिमंडळात दाखल झाला आहे. बावनकुळे यांच्या उमेदवारीचे सकारात्मक परिणाम आजूबाजूच्या मतदारसंघात देखील दिसून आले आहेत.












Click it and Unblock the Notifications