मोठी बातमी! कळमनुरीत शिवसेनेच्या संतोष बांगर यांचा 31 हजार 83 मतांनी विजयी, संतोष टारफेंचा पराभव
Kalmanuri Election 2024 Shiv Sena Santosh Bangar Win : शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने अत्यंत प्रतिष्ठेचा केलेल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघात अखेर एकनाथ शिंदेंचे उमेदवार संतोष बांगर यांनी बाजी मारली. कळमनुरीत शिवसेनेच्या संतोष बांगर यांनी ठाकरे गटाचे संतोष टारफे यांचा 31 हजार 83 मतांनी पराभव केला.
या मतदारसंघात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अशा दोन्ही गटांनी आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली होती. दोन्ही गटांच्या नेत्यांनी झंझावाती दौरे काढून आपापल्या उमेदवारांचा प्रचार केला होता. पण अखेरीस संतोष बांगर यांनी बाजी मारली.

संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. आक्रमक आणि रांगडा शिवसैनिक अशी संतोष बांगर यांची ओळख आहे. 2019 साली ते कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. 2022 साली शिवसेनेत मोठा उलटफेर झाला. एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण उभारले आणि बघता बघता 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला.
एकनाथ शिंदे हेच पुढे भाजपाच्या पाठिंबावर राज्याचे मुख्यमंत्री झाले. आणि शिवसेना भाजपा युतीचे सरकार सत्तेत आले. उद्धव ठाकरे यांच्या गटातून सर्वात शेवटी एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळणारा आमदार म्हणजे संतोष बांगर होय. संतोष बांगर यांना एकनाथ शिंदे यांनी चांगलीच मदत केली.
एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी संतोष बांगर यांच्या विरोधात रान उठवले. संतोष बांगर यांच्या बदनामीच्या मोहिमा सुरू झाल्या. पण एरवी आक्रमक होणाऱ्या संतोष बांगर यांनी त्याला फारसे प्रत्युत्तर दिले नाही. त्यांच्या गाडीवर हल्ल्याचाही एकदा प्रयत्न झाला. संतोष बांगर यांनी संघटन बांधणीकडे अधिक लक्ष दिले.
ऑक्टोबर महिन्यात मराठवाड्यात प्रचंड मोठा पाऊस झाला. नद्या नाल्यांना पूर आला. घराघरात पाणी शिरले. शेकडो लोक पुराच्या पाण्यामुळे प्रभावित झाले. अनेकांना घरे दारे सोडावी लागली. त्यावेळी पुराच्या पाण्यात उतरून संतोष बांगर यांनी पूरग्रस्तांना मदत केली. त्यांच्या मदत कार्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. विरोधकांनीही बांगर यांच्या कामाचे मनमुराद कौतुक केले.
विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा संतोष बांगर यांना संधी दिली तर उद्धव ठाकरे गटाकडून संतोष टारफेयांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा हा रंगतदार संघर्ष होता. योगायोग म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई असली तरी त्याबरोबरच ती संतोष विरुद्ध संतोष अशी ही लढाई होती. दोन्ही गटांनी ही लढाई निकराची केली. अखेरीस एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा विजय झाला. कळमनुरी विधानसभा मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेचेच वर्चस्व असल्याचे या निकालाने सिद्ध केले.












Click it and Unblock the Notifications