आव्हाड-पडळकर वादावर जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण; "संतोष देशमुखांच्या भावाला....
सध्या मुंबईत सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. याच संघर्षातून बुधवारी एक धक्कादायक घटना घडली. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात विधानमंडळाच्या आवारातच शाब्दिक वाद झाला.

या वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात शिवीगाळ झाल्याचे दिसत आहे. या घटनेबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी (आज) प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली.
जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, "गोपीचंद पडळकर काल (बुधवारी) म्हणाले की, 'माझ्या गाडीसमोर कोणी आले तर मी असाच दरवाजा उघडणार.' हा सत्तेचा माज आहे." आव्हाडांनी पुढे स्पष्ट केले, "त्यांच्या गाडीचा दरवाजा मला नाही, तर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांना लागला. यामुळेच मी त्यांना बोललो. त्यानंतर गोपीचंद पडळकर विधानमंडळ परिसरात शिव्या देऊ लागले."
आव्हाडांनी पडळकरांना आव्हान देत म्हटले, "तुम्ही जर अशीच गाडी चालवणार असाल, तर आम्ही काय करणार? बंदुका घेऊन या, आमचा जीव घ्या!" आव्हाड यांनी आपल्या "मंगळसूत्र चोर" या वक्तव्यावरही स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "मी परवाच्या दिवशी फक्त 'मंगळसूत्र चोर' असे बोललो, म्हणून त्यांना एवढा राग आला. पण मी 'मंगळसूत्र चोर' का बोललो? कारण मी कोणावर वैयक्तिक टीका करत नाही. मला त्या दिवशी त्यांनी 'अर्बन नक्षल' आणि 'मुसलमानांचा एक्स' असे म्हटले होते." आव्हाडांनी पुढे नमूद केले, "मी पंधरा-वीस कार्यकर्त्यांसोबत फिरत नाही, मी एकटा फिरतो. घाला गाडी माझ्यावर."
काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवन परिसरातून जाताना "मंगळसूत्र चोराचा... मंगळसूत्र चोराचा..." अशा घोषणा दिल्या होत्या, ज्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. यावरून जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावरही शाब्दिक चकमकी झाल्या होत्या. गोपीचंद पडळकर हे सातत्याने पवार कुटुंबीयांवर खालच्या भाषेत टीका करत असल्याने यापूर्वीही अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. पडळकर वारंवार शरद पवार आणि त्यांच्या घराण्याला लक्ष्य करत असल्याचे दिसून येते.












Click it and Unblock the Notifications