एपस्टाईन वादावर हरदीप पुरींचे स्पष्टीकरण; म्हणाले-तीन-चार बैठका झाल्या, पण त्या केवळ व्यावसायिक
Hardeep Singh Puri on Epstein Controversy India : जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'जेफ्री एपस्टाईन फाईल्स'वरून आता भारतीय राजकारण तापले आहे. संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नाव घेतल्यानंतर, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली आहे. लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईन याच्याशी असलेले सर्व संबंधांचे आरोप त्यांनी निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत.

व्यावसायिक भेटी अन् राहुल गांधींचा आरोप
लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी एपस्टाईन प्रकरणाचा उल्लेख करत हरदीप पुरी यांच्यावर निशाणा साधला होता. राहुल गांधी म्हणाले होते की, अनिल अंबानींचे नाव एपस्टाईन फाईल्समध्ये का आहे? त्यांना एपस्टाईनशी कोणी ओळख करून दिली हे मला माहीत आहे आणि हरदीप पुरी यांनाही ते माहीत आहे.
या आरोपाला उत्तर देताना हरदीप पुरी म्हणाले की, २००९ मध्ये न्यूयॉर्कमध्ये भारताचे राजदूत म्हणून पदभार स्वीकारल्यापासून ते २०१७ मध्ये मंत्री होईपर्यंतच्या काळात केवळ तीन-चार वेळा एपस्टाईनशी भेट झाली होती. मात्र, हे संभाषण पूर्णपणे व्यावसायिक होते आणि ते 'बहुपक्षीयतेवरील स्वतंत्र आयोग' व अन्य आंतरराष्ट्रीय विषयांच्या संदर्भात होते.
३० लाख ईमेल प्रसिद्ध झाले आहेत, पण त्यात माझ्या संदर्भात केवळ तीन-चार व्यावसायिक बैठकांचा उल्लेख आहे. माझा कोणत्याही गैरकृत्याशी काडीचाही संबंध नाही, असे हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले.
परराष्ट्र मंत्रालयाचे कडक शब्दांत स्पष्टीकरण
या वादात परराष्ट्र मंत्रालयानेही (MEA) उडी घेतली असून एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. ईमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २०१७ च्या इस्रायल दौऱ्याचा उल्लेख असल्याच्या वृत्तावर मंत्रालयाने म्हटले आहे की, पंतप्रधानांचा तो दौरा अधिकृत, नियोजित आणि तथ्यात्मक होता. ईमेलमधील उर्वरित माहिती ही एका गुन्हेगाराने (एपस्टाईन) रचलेले बनावट आणि निराधार कथानक आहे. अशा खोट्या दाव्यांना पूर्णपणे फेटाळून लावले पाहिजे.
इतर बैठकांवरही केले भाष्य
हरदीप पुरी यांनी स्पष्ट केले की, त्यांनी 'लिंक्डइन'चे संस्थापक रीड हॉफमन यांचीही भेट घेतली होती. मात्र, ही भेट भारतातील इंटरनेट क्रांती आणि व्यवसायातील संधींबाबत चर्चा करण्यासाठी होती. त्यावेळी आपण एक खाजगी नागरिक म्हणून भारताच्या विकासाची मते मांडत होतो, असेही त्यांनी नमूद केले.
कोण होता जेफ्री एपस्टाईन?
जेफ्री एपस्टाईन हा न्यूयॉर्कमधील एक अब्जाधीश फायनान्सर होता, ज्याचे संबंध जगातील बड्या राजकारणी आणि सेलिब्रिटींशी होते.
गुन्हेगारी इतिहास: २००८ मध्ये अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध मागितल्याबद्दल त्याला १३ महिने तुरुंगवास झाला होता.
२०१९ अटक : २०१९ मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय लैंगिक तस्करीच्या (Sex Trafficking) आरोपाखाली अटक करण्यात आली.
आत्महत्या : खटला सुरू होण्यापूर्वीच २०१९ मध्ये त्याने तुरुंगात आत्महत्या केली.
सहकारी : त्याची जोडीदार घिसलेन मॅक्सवेल सध्या या गुन्ह्यात मदत केल्याबद्दल २० वर्षांची शिक्षा भोगत आहे.












Click it and Unblock the Notifications