आज देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस, मुख्यमंत्र्यांच्या तुम्हाला माहीत नसलेल्या 'या' गोष्टी जाणून घ्या
Happy Birthday Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज २२ जुलै २०२५ रोजी जन्मदिवस, राजकीय जीवनात कमालीचे यशस्वी ठरलेले देवेंद्र फडणवीस आज आपला ५५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. ५ डिसेंबर २०२४ पासून त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द सांभाळताना शाबासकीसह आरोप प्रत्यारोपही त्यांच्यावर झाले आहेत. पण त्यांना फडणवीस यांनी तोंड देत आव्हानांचा सामनाही केलेला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अनेक किस्से त्यांच्याच पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितले आहेत. दोघांचे प्रेम, लग्न ते राजकीय जीवनात रात्री-अपरात्री वेश पालटून, हुडी घालून दाढीमिशा लावून कोणत्याही सुरक्षेशिवाय घराबाहेर जाणे आदी गोष्टी प्रकाशझोतात आल्या, पण देवेंद्र फडणवीसांचा एक किस्सा असाही आहे, जो तुम्हाला कदाचित माहीत नसेल आणि काही गोष्टी तुम्हाला माहित नसेल त्या जाणून घेऊया.

सर्वात तरुण मुख्यमंत्री
३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. त्यापूर्वी, वयाच्या ३८व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.
सर्वात कमी काळ मुख्यमंत्री
२०१९ छुप्या पद्धतीने सरकार स्थापन करून सर्वात कमी काळासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांची नोंद आहे. या शपथविधीला पहाटेचा शपथविधी म्हटले जाते कारण याच पद्धतीने त्यांनी अजित पवारांसोबत शपथग्रहण समारंभ घेतला होता.
५ डिसेंबर १९६३ ते २१ फेब्रुवारी १९७५ या काळात ११ वर्षांहून अधिक काळ कार्यभार सांभाळणारे वसंतराव नाईक आतापर्यंत सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. देवेंद्र फडणवीस (२०१४-२०१९) पाच वर्षांची टर्म त्यांनी पुर्ण केली. त्यानंतर काही तासांची त्यांची सर्वात छोटी टर्म होती, आता महायुती सरकारमध्ये ते पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या टर्मची बरोबरी करण्याची त्यांच्याकडे संधी आहे असे बोलले जाते.
- देवेंद्र फडणवीस १७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
- वडीलांचा राजकीय वारसदार म्हणून पुढे नेत वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकले.
- वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर होण्याचा मान मिळवला.
- देवेंद्र फडणवीस यांनी बँकर असलेल्या अमृता फडणवीस यांच्याशी २००५ मध्ये लग्न केले.
- २००७ साली या जोडप्याला दिविजा नावाची मुलगी झाली.
या शाळेत दिला होता शिकण्यास नकार..
देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा काॅन्व्हेंटमध्ये शिकण्यास नकार दिला होता हे आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल पण त्यामागे एक मोठे कारणही आहे. मिडिया रिपोर्टनुसार, आणीबाणीचा काळात त्यांच्या वडिलांना इंदिरा गांधी सरकारने अटक केली होती, त्यामुळे त्यांनी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी आपल्या आईला सांगितले होते. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले होते असे सांगितले जाते.
नंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले. व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले.












Click it and Unblock the Notifications