अदानी समुह होतोय रिअल इस्टेटचा बादशहा; धारावीनंतर आता मुंबईतला 'हा' ३६ हजार कोटींचा प्रकल्पही हातात
धारावी झोपडपट्टीचा काही लाखो कोटींचा प्रकल्प हातात घेतल्यानंतर आता प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना मुंबईत आणखी एक प्रकल्प मिळाला आहे. गोरेगाव पश्चिम येथील ३६ हजार कोटींचा प्रकल्प अदानी यांच्या हाती लागला आहे. आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आता रिअल इस्टेटमध्येही वर्चस्व मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे.

अदानींचे रिअल इस्टेटमध्येही वर्चस्व
रिअल इस्टेट क्षेत्र अदानी ग्रुप सध्या सर्वोच्च स्थानावर जात असल्याचे दिसत आहे. केंद्र व राज्यातील भाजप सरकारनेही रिअर इस्टेट क्षेत्रावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. अशा परिस्थितीत देशातील आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी देखील मुंबईत नंबर वन होण्याचे स्वप्न पाहत आहेत.
धारावी प्रकल्पही अदानींकडे
आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावीचा पुनर्विकास प्रकल्पही अदानी समुह विकसीत करत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड मध्ये अदानी ग्रुपचा ८० टक्के हिस्सा आहे. उर्वरित हिस्सा राज्य सरकारकडे आहे. गेल्या आठवड्यात, मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाला (म्हाडा) बांधकाम आणि विकास एजन्सी (सी अँड डीए) मार्फत मोतीलाल नगरचा पुनर्विकास करण्याची परवानगी दिली. राज्य सरकारने याला एक विशेष प्रकल्प म्हणून घोषित केले. म्हाडाचे त्यावर नियंत्रण आहे परंतु काम पूर्ण करण्याची आवश्यक क्षमता नसल्यामुळे त्यांनी सी अँड डीए मार्फत काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
नेमका काय आहे प्रकल्प?
धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित असलेल्या मोतीलाल नगरच्या पुनर्विकासासाठी अदानी समूहाने ३६,००० कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावली. गोरेगाव (पश्चिम) च्या उपनगरीय भागात १४३ एकरवर पसरलेले मोतीलाल नगर-१, २ आणि ३ हे मुंबईतील सर्वात मोठ्या गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पांपैकी एक आहेत. अदानी समूहाची अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड (एपीपीएल) या कंपनीने या प्रकल्पासाठी सर्वाधिक बोली लावली. एलअँडटी या कंपनीपेक्षा जास्त बिल्ट-अप एरिया ऑफर केल्यामुळे हा प्रकल्पही अदानी समुहाला मिळणार आहे या प्रकल्पासाठी अदानी समूहाला लवकरच वाटप पत्र दिले जाणार आहे.
कधी होणार प्रकल्प पूर्ण?
मोतीलाल नगर परिसराला आधुनिक फ्लॅट्स असलेल्या परिसरात रूपांतरित करण्याचा प्रयत्न अदानी ग्रुप करणार आहे. मोतीलाल नगर पुनर्विकासाचा खर्च सुमारे ३६,००० कोटी रुपये आहे. हा प्रकल्प सात वर्षांच्या आत तयार केला जाणार आहे. मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या निविदा अटींनुसार, ३.८३ लाख चौरस मीटर निवासी क्षेत्र सी अँड डीएला देण्याची तरतूद आहे. अदानी समूहाच्या कंपनीने ३.९७ लाख चौरस मीटर क्षेत्र म्हाडाला देण्यास सहमती दर्शवून बोली जिंकली आहे.












Click it and Unblock the Notifications