Gauri-Ganesh : गौरीला का दाखवला जातो मांसाहाराचा नैवेद्य? जाणून घ्या सविस्तर
Gauri- Ganesh : राज्यभरात सगळीकडे गणशोत्सवाची धूम सुरू आहे. गणपतीबरोबरच आता मंगळवारी 10 सप्टेंबर रोजी गौरी आगमन होत आहे. राज्यातील विविध भागांत वेगवेगळ्या पद्धतीने गौरी पूजन साजरे केले जाते. कोकणातील अनेक गावांमध्ये आजही पारंपारिक पद्धतीने सर्व प्रथा परंपरांचे पालन करत गौरींचे स्वागत केले जाते आणि तिचा पाहुणचार केला जातो. यावेळी गौरीला भाजी-भाकरीचा, गोडाचा किंवा फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. पण कोकणातील अनेक गावांमध्ये गौरीला तिखटाचा म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो.
गौरीच्या आगमनानंतर अनेक घरांमध्ये सर्व महिला एकत्र येत झिम्मा-फुगडी, बस-फुगडी असे खेळ रात्रीपर्यंत खेळतात. घरी आलेल्या माहेरवाशिणीसोबत रात्र जागवली जाते. गौरीचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लाडक्या गौरीसाठी तिखटाचा नैवेद्य दाखवला जातो. कोकणातील अनेक गावांत पूर्वीपासूनच चालत आलेली ही परंपरा जपली जाते. या मांसाहारी नैवेद्यात नेमके काय असतं असा प्रश्न सर्वांनाच पडतो. गौराईसाठी मटण, चिकन, खेकडे, मासे यांचा नैवेद्य दाखवला जातो.

मांसाहारी नैवेद्य दाखवण्यामागे अशी आहे आख्यायिका
गौरीला मांसाहाराच नैवद्य दाखवण्यामागे पौराणिक कथा सांगितली जाते. गौरीचे शंकराबरोबर लग्न झाले. पण ती जेव्हा माहेरी जायला निघाली तेव्हा शंकराने तिच्या सोबतीला रक्षणासाठी आपले भूतगण पाठवले. गौरी माहेरी आलेली पाहून माहेरच्या माणसांना खूप आनंद झाला. त्यांनी तिची पूजा केली चांगला पाहुणचार केला तिच्यासाठी गोडधोड जेवण बनविले. पण भूतगणांसाठी काहीच बनविले नाही. ही गोष्ट गौरीच्या लक्षात आली. तिने त्यांच्या जेवणाची सोय करण्याची विनंती माहेरच्या लोकांना केली, पण शंकराचे भूतगण हे स्मशानात राहत असल्याने त्यांना मांस आवडत असे.
तिने त्यांच्यासाठी मांसाची व्यवस्था करायला लावली. त्यावेळी मांसाहार वर्ज्य असूनही तिने केवळ भूतगणांचे मन दुखवू नये यातून तळमळीने त्यांना मांसाहार देण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर त्यांना मांसाहार मिळाल्यानंतरच तिने भोजन केले. या प्रसंगाची आठवण म्हणून जेव्हा गौरी घरी येतात तेव्हा तिच्या बरोबर भूतगण आहेत असे गृहीत धरून त्यांच्यासाठी मासांहारी जेवण बनविले जाते केले जाते. भूत गण खूश झाले तर गौरी आपल्यावर प्रसन्न होईल अशी भावना आहे. त्या दिवशी मांसाहारी जेवण बनविले जाते पण त्याचा नैवैद्य गौरीला दाखविला जात नाही, कारण तो नैवेद्य भूतगणांसाठी असतो.












Click it and Unblock the Notifications