पुण्यातील या जागृत गणपतीचे का पडले 'गुंडाचा गणपती' हे नाव? जाणून घ्या
Ganesh Chaturthi 2024 :देशभरात गणेशोत्सव हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. विघ्नहर्त्या गणेशाच्या आगमनानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. जसं गणपती बाप्पाला या विशेष नावांनी ओळखलं जातं, तसेच पुण्यातल्या काही देवतांना तसेच पुण्यात वेगवगेळ्या नावांचे गणपतीही आहेत, ही वेगवेगळी नावे ऐकून, पाहून मनात अनेक प्रश्नसुद्धा निर्माण पण पुण्यातील अशाच एका गणपती बाप्पाच्या मंदिराबद्दल आणि त्या मंदिराच्या नावामागचा इतिहास नेमका काय आहे हे आज जाणून घेणार आहोत.
पुण्याला मंदिरांचं शहर अशी ओळख देणारी अनेक मंदिरे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आहेत. त्यापैकीच एक म्हणजे गुंडाचा गणपती. कसबा पेठेमध्ये हा गुंडाचा गणपती असून या गणपतीला असे नाव का आहे, असा प्रश्न सर्वांना पडतो.

असे पडले नाव
कसबा पेठेमधील शिंपी आळीमध्ये हा गुंडाचा गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर पेशवेकालीन आहे. गुंडाचा गणपती याची स्थापना नागोजी गुंड नामक व्यक्तीने केल्यामुळे गणपतीला 'गुंडाचा गणपती' असंच नाव पडलं. नागोजी गुंड हे पेशवाई दरबाराशी संबंधित होते. मुत्सद्दी नाना फडणीस यांचे नागोजी गुंड हे सहकारी होते.
पेशवाई रोजनिशीमध्ये देखील गुंडाचा गणपतीचा उल्लेख आढळतो. गुंडाच्या 'त्याच्या घराजवळील गणपती'असा दुसरे बाजीराव पेशवे यांच्या 1810-11 सालामधील रोजनिशीमध्ये उल्लेख आहे. असा हा गुंडाचा गणपती पेशवाईच्या काळापासून नावाजलेला आणि प्रसिद्ध आहे.
गुंडाचा गणपती मंदिर हे लाकडी बांधकामी आणि कौलारु आहे. पेशवाईच्या काळामध्ये मंदिर बांधण्यात आले असून वेळोवेळी त्याची डागडुजी करण्यात आली. मंदिराला लाकडी छत आणि सभामंडप आहे. सभामंडपामध्ये लाकडी खांब असून बसण्यासाठी जागा आहे. मंदिराचे गर्भगृह पूर्णपणे दगडी असून चांदीची कमान आहे. मंदिराला सुबक आणि रेखीव असा कळस आहे. लांबून अगदी कौलारु घरासारखे हे मंदिर भासते.
अशी आहे मूर्तीची रचना
गुंडाच्या गणपतीची ही मूर्ती पाच फूट उंचीची असून शेंदूर लेपण केलेली आहे. हा गणराय उजव्या सोंडेचा असून चतुर्भुज आणि दोन्ही पाय खाली सोडून बसलेला आहे. वरच्या दोन्ही हातांत पाशांकुश, डाव्या खालील हातात मोदक आणि उजवा खालील हात आशिर्वाद देताना आहे.
मूर्तीची नजर अत्यंत प्रभावी असून पोटावर नाग बांधलेला आहे. गणरायाचे हे पूर्ण आणि सुंदर रुप पाहून गुंडाचा गणपतीचे दर्शन घेणारा प्रत्येक भाविक सुखावतो. मंदिराचे नाव गुंड असले तरी आतील गणरायाची प्रतिमा अत्यंत मनमोहक अशा स्वरुपाची आहे. पुण्यातील ऐतिहासिक अशा गणपतींमध्ये गुंडाचा गणपतीची नक्की गणना होते.












Click it and Unblock the Notifications