मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांची तब्बेत बिघडली; वैद्यकीय पथक पोहोचले मूळ गावी
येत्या पाच डिसेंबरला मंत्रीमंडळाचा शपथविधी होणार असल्याच्या बातम्या येत असताना, राजकीय वर्तुळातून आता नवी बातमी समोर येत आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्बेत अचानक बिघडली, असून मुंबईहून वैद्यकीय पथक आता त्यांच्या गावी गेले आहे. मुख्यमंत्री सध्या त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी आराम करत आहेत.

एकनाथ शिंदे यांची तब्बेत बिघडली
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी आपल्या मुळगावी दरे येथे आले. ते नाराज असून आपल्या गावी गेल्याच्या बातम्या आल्या. मात्र आता एक नवीन माहिती समोर येत आहे. यांची प्रकृती बिघडल्याने ते आपल्या मूळ गावी विश्रांतीसाठी आल्याचे आता सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकती बिघडल्याने डॉक्टरांचे पथक तपासणीसाठी त्यांच्या दरे येथील निवासस्थानी दाखल झाले आहे. तेथेच त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे.
शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा
मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदावरुन एकनाथ शिंदे हे भाजपसोबत नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र त्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत, आपण पूर्णपणे भाजपच्या पाठीशी असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली होती. मात्र तरीही त्यांच्या नाराजीच्या बातम्या सुरुच होत्या. त्यातच एकनाथ शिंदे हे आपल्या मुळ गावी गेल्यानंतर ते खरोखर नाराज आहेत का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. भाजपने एकनाथ शिंदे यांचा फक्त वापर केल्याचा आरोप, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.
उदय सामंत यांनी दिलं स्पष्टीकरण
शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, एकनाथ शिंदे हे नाराज आहेत म्हणून, आपल्या गावी दरे येथे गेले आहेत, हे म्हणणं चुकीचं आहे. मला वाटतं त्यांनी एका वाक्यात आपलं म्हणणं मांडलं होतं. मी नाराज होऊन रडणारा नाही तर लढणारा आहे, असं एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. त्यामुळे तेच काय आम्ही कुणीही नाराज नाहीत. निवडणुकीच्या धावपळीमुळे काही आरोग्याच्या अडचणी निर्माण होतात. धावपळीमुळे त्यांना त्रास जाणवला असेल, असही सामंत यांनी स्पष्ट केलं.
उपमुख्यमंत्रीपदी दुसरा नेता?
भाजपच्या जास्त जागा आल्याने मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे जाणार हे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे किमान गृहमंत्रीपद शिवसेनेला मिळावं, यासाठी एकनाथ शिंदेंचा आग्रही असल्याचं सांगितलं जातंय. गृहमंत्रीपद दिलं, तरच आपण उपमुख्यमंत्रीपद स्विकारु ही एकनाथ शिंदे यांची भूमिका असल्याच्याही चर्चा होत्या. दुसरीकडे भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री व्हावे यासाठी आग्रह धरला आहे मात्र गृहमंत्रीपदावरही दावा कायम ठेवला आहे. असं झालं तर, शिवसेना दुसऱ्या एखाद्या नेत्याला उपमुख्यमंत्रीपदाची संधी देईल का, हे पहावे लागणार आहे.












Click it and Unblock the Notifications