Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

HMPV विषाणूमुळे घाबरून जायचं कारण नाही, पण लहान मुलांची काळजी घ्या- डाॅ. प्रदीप आवटे यांचा सल्ला

How to protect children from HMPV virus : HMPV म्हणजेच ह्यूमन मेटान्यूमो या विषाणूच्या प्रसारामुळे आपल्याकडे चिंतेचं वातावरण आहे. पण HMPV हा विषाणू आणि कोविडच्या विषाणूमध्ये मोठा फरक आहे. HMPV हा विषाणू जुनाच आहे आणि त्याला प्रतिकार करण्याची आपल्या शरीराची क्षमता विकसित झालेली आहे. तसंच ही महासाथ नाही त्यामुळे या विषाणूचा प्रसार होऊन कोविडसारखी महासाथ येईल, लाॅकडाऊन लावावा लागेल, रुग्णांचं अलगीकरण करावं लागेल, अशी स्थिती अजिबातच नाही, असं डाॅ. प्रदीप आवटे यांनी म्हटलं आहे.

डाॅ. प्रदीप आवटे यांनी स्वाइन फ्लू आणि कोविडच्या साथीच्या काळात राज्य सर्वेक्षण अधिकारी म्हणून काम केलं आहे. साथीच्या रोगांचं नियंत्रण आणि सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रातला त्यांचा अनुभव दांडगा आहे. वनइंडिया मराठी ने त्यांची खास मुलाखत घेतली.

लहान मुलांना याची सर्वाधिक बाधा

कोरोनाच्या विषाणूप्रमाणे HMPV मध्ये अचानक मोठे बदल म्हणजे म्युटेशन्स होत नाहीत. त्यामुळे त्याचा प्रतिकार करणं तेवढं कठीण नाही. पण लहान मुलांना याची बाधा होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी लागेल, असं डाॅ. आवटे यांनी म्हटलं आहे. लहान मुलांमध्ये वयाच्या पाचसहा वर्षांपर्यंत रोगप्रतिकार क्षमता विकसित झालेली नसते. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते, असं ते म्हणाले.

HMPV virus

अगदी सहा महिन्याच्या बाळापासून ते तीनचार वर्षांच्या लहान मुलांमध्ये फ्लूसारखी लक्षणं आढळली तर तत्परतेने उपचार करण्याची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. घऱातल्या वृद्ध माणसांमुळे लहान मुलांपर्यंत याचा संसर्ग पसरू नये यासाठी आपण दक्ष राहिलं पाहिजे, असंही ते म्हणाले. लहान बाळांच्या बाबतीत आईचं दूध हा सर्वोत्तम आहार आहे. त्याचप्रमाणे लहान बाळांना द्यायच्या लसीही वेळेत दिल्या पाहिजेत, याची आठवण डाॅ.आवटे यांनी करून दिली.

मुलांच्या आहारावर लक्ष देण्याची गरज

थोड्या मोठ्या मुलांच्या बाबतीतही त्यांच्या आहारावर लक्ष देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मुलांना सर्दी, ताप अशी लक्षणं आढळली तर त्याला घऱातच थांबायला सांगून उपचार करावे. त्याच स्थितीत त्याला किंवा तिला शाळेत पाठवलं तर हा संसर्ग वाढण्याचा धोका असतो, असं डाॅ. आवटे यांनी सांगितलं. असं असलं तरी कोणत्याही शहरात HMPV चे रुग्ण आढळले म्हणजे त्या शहरात त्याची मोठी साथ पसरेल, अशीही शक्यता या विषाणूच्या बाबतीत दिसत नाही, हाही दिलासा त्यांनी दिला आहे.

हिवाळ्याच्या दिवसांत अशा प्रकारच्या विषाणूंचा प्रसार होऊन आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. हवेचं प्रदूषण हाही त्यामागचा एक घटक आहे. त्याबरोबरच श्वसनाच्या विकारांचं प्रमाण आपल्याकडे वाढत चाललं आहे. आपल्याला कोविड 19 चा भयाकारी अनुभव आहे. त्यामुळे अशा विषाणूंच्या साथीच्या धोक्याने आपण घाबरून जातो. पण त्याहीपेक्षा टीबी म्हणजे क्षयरोगाचं प्रमाण मोठं आहे. त्यासाठी आवश्यक त्या चाचण्या करणं, वेळीच उपचार घेणं महत्त्वाचं आहे, असं डाॅ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं.

श्वसनाच्या विकारांची प्रमुख कारणं काय?

हवेचं प्रदूषण, निकृष्ट आहार ही श्वसनाच्या विकारांची कारणं आहेत. त्याचप्रमाणे तंबाखूचं सेवन, धूम्रपान यामुळेही श्वसनाचे विकार होतात. तंबाखू खाऊन कुठेही थुंकणं, गर्दीच्या ठिकाणी केलं जाणारं धूम्रपान यामुळे इतरांनाही श्वसनाच्या विकारांचा धोका निर्माण होतो. म्हणूनच धूम्रपान करणाऱ्यांनी आपल्या आणि इतरांच्या आरोग्याचा विचार करून अशा सवयी टाळल्या पाहिजेत, असंही ते म्हणाले.

कोविडच्या महासाथीने आपल्याला आरोग्याबद्दलचे मूलभूत धडे दिले. त्यामुळे मी या विषाणूला कोविड गुरुजी असं म्हणतो. पण या कोविड गुरुजींनी दिलेले धडे आपण आता विसरून गेलो आहोत, असं डाॅ. प्रदीप आवटे यांचं म्हणणं आहे. एखाद्या विषाणूबद्दल ऐकल्यानंतर आपण तेवढ्या काळापुरते सावध होतो आणि मग पुन्हा आपल्या जुन्या सवयींवर येऊन थांबतो हे टाळलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

कोविडच्या काळात मास्क सक्तीचा होता तसं आता पुन्हा करण्याची गरज नाही. पण हात स्वच्छ धुणे, फ्लूची लक्षणं दिसायला लागली तर वेळीच उपचार घेणे या गोष्टी केल्या पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

HMPV हा विषाणू सर्वात आधी चिमणीमध्ये आढळला होता. पण आता चिमण्यांमार्फत याचा प्रसार होतो, असं अजिबातच नाही. त्यामुळे चिमण्या मारणं हा यावरचा उपाय होऊ शकत नाही. या विषाणूचा प्रसार माणसांकडून माणसांमध्ये होतो आहे. त्यामुळे कोविडच्या काळात जसे वटवाघळं, खवले मांजर या प्राण्यांबाबत गैरसमज पसरले आणि वटवाघळं मारण्याच्या घटना घडल्या तसे प्रकार रोखायला हवेत हेही डाॅ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं आहे.

चीनमध्ये HMPV चा प्रसार वाढताना दिसत असला किंवा त्याचे रुग्ण आढळले तरी तिथेही महासाथ आली आहे, असं नाही. कोविडच्या अनुभवामुळे चीनमध्ये सावधगिरी बाळगली जात आहे आणि रुग्णांच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे हा विषाणू चर्चेत आहे. पण चीनमधून हा विषाणू आपल्याकडे येईल किंवा कोविडसारखी महासाथ येईल ही भीती आपण मनातून पुरती काढून टाकली पाहिजे, असंही डाॅ. आवटे यांनी सांगितलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+