मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री होणार..? स्वतः पोस्ट करत केला 'हा' खुलासा
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश संपादन केले. मात्र आता आठवडा उलटत आला तरी, मुख्यमंत्र्यांचे नाव फायनल झालेले नाही. मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार, हे ठरलेले असले तरी, फडणवीस की अन्य कुणी हे अजून ठरलेले नाही. त्यातच आता पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्रीपदासाठी होऊ लागल्याचे दिसत आहे. या चर्चानंतर आता स्वतः खा. मुरलीधर मोहोळ यांनी या सर्व प्रकारांचा खुलासा केला आहे.

भाजपचा मुख्यमंत्री नेमका कोण
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज आठवडा उलटला आहे. या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत, भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा ठरला. मात्र अद्यापही राज्याला नवा मुख्यमंत्री मिळालेला नाही. गुरूवारी महायुतीच्या नेत्यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेत चर्चा केली. या यशाचे शिल्पकार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून पुन्हा चर्चा सुरू झाली. मात्र असं असतानाच आता अचानक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. सोशल मीडियावर त्यांच्या नावाची बरीच चर्चा होताना दिसत आहे.
मोहोळांनी फेटाळला दावा
मात्र मुरलीधर मोहोळ यांनी या बातम्या साफ फेटाळून लावल्या आहेत. सोशल मीडियाच्या एक्स साईटवर ट्विट करत त्यांनी या बातम्यांचे खंडन केलं. समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित असल्याचे त्यांनी नमूद केलंय. मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे खासदार असून लोकसभी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी पुण्यात प्रचार सभा घेतली होती. ही निवडणूक जिंकत पुण्याचे खासदार म्हणून मोहोळ हे लोकसभेत पोहोचले. एवढंच नव्हे तर त्यांना केंद्रात मंत्रीपदही मिळालं. आता अचानक राज्यातील मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) November 29, 2024
आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.
आमच्या…
काय म्हटलेत मुरलीधर मोहोळ?
समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे, असे मोहोळ म्हणाले. आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.












Click it and Unblock the Notifications