धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत अजित पवारांचे सूचक विधान! अजितदादा म्हणतात पुन्हा मंत्रिपद....
राज्याच्या राजकारणात सध्या एक मोठी बातमी चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या ताज्या विधानामुळे या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे. कृषी विभागाशी संबंधित आरोपांमधून न्यायालयाने मुंडे यांना क्लीनचिट दिल्यानंतर, आता आणखी एका प्रकरणात क्लीनचिट मिळाल्यास त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.

पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, "धनंजय मुंडेंवरील कृषी विभागाच्या आरोपांबाबत तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये वाचले असेलच. न्यायालयाने त्यांना त्या प्रकरणातून पूर्णपणे दोषमुक्त केले आहे. आता त्यांच्याशी संबंधित आणखी एका प्रकरणावर पोलीस यंत्रणा काम करत आहे. जर त्यांना त्या प्रकरणातही क्लीनचिट मिळाली, तर आम्ही त्यांना निश्चितपणे पुन्हा मंत्रिपद देऊ."
यापूर्वी, बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणात वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली असून, तो धनंजय मुंडे यांच्या जवळचा कार्यकर्ता मानला जात होता. त्यामुळे विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली होती. त्यावेळी मुंडे यांनी प्रकृतीचे कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
आता कृषी विभागाच्या आरोपांमधून मुंडे यांना क्लीनचिट मिळाल्याने आणि अजित पवारांच्या विधानामुळे, धनंजय मुंडे यांच्या राजकीय पुनरागमनाची शक्यता बळावली आहे. दुसऱ्या एका प्रकरणातूनही त्यांना क्लीनचिट मिळताच ते पुन्हा मंत्रिपदी विराजमान होऊ शकतात, असे दिसते.












Click it and Unblock the Notifications