देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? उद्धव ठाकरेंकडून वाढदिवसानिमित्त कौतुक; नेमके काय म्हणाले?
आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस असून, यानिमित्त त्यांना सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. या कौतुकामुळे देवेंद्र फडणवीस भविष्यात केंद्रात मोठी भूमिका बजावणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

'महाराष्ट्र नायक' पुस्तकातून कौतुकाचे बोल
गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'महाराष्ट्र नायक' या पुस्तकात उद्धव ठाकरे यांनी एक लेख लिहिला आहे. या लेखात उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, "महाराष्ट्राच्या राजकारणात गंगाधरराव फडणवीस यांनी एक आदर्श राजकारणी म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली होती. हा वारसा अत्यंत मेहनतीने आणि समर्थपणे चालवण्याचे कार्य देवेंद्र गंगाधरराव फडणवीस करत आहेत."
फडणवीसांच्या कार्यशैलीचे कौतुक
"देवेंद्र आज महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे २०१४ ते २०१९ दरम्यान आम्ही त्यांच्यासोबत होतो. त्यामुळे त्यांची विषय समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला," असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. त्यानंतर विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची काम करण्याची धडपडही जवळून पाहता आल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे यांच्या मते, "देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत."
अभ्यासू आणि मुत्सद्दी नेतृत्व
उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीतील आव्हानांचाही उल्लेख केला. "देवेंद्र फडणवीस यांना राजकीय कारकिर्दीत अनेकदा विविध विषयांमुळे अडचणींचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी आपल्या अभ्यासू आणि मुत्सद्दी स्वभावाने या आव्हानांचा सामना केला आहे." फडणवीसांच्या २०१४-२०१९ च्या कार्यकाळात महाराष्ट्राने औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केल्याचेही ठाकरे यांनी म्हटले. 'मेक इन महाराष्ट्र' आणि 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' यांसारख्या योजना त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबवल्या गेल्या, ज्यामुळे पक्षात त्यांची विश्वासार्हता वाढली, असे ठाकरे यांनी नमूद केले.
भविष्यातील राष्ट्रीय भूमिकेचे संकेत
फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता असल्याचे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. "त्यांचा अभ्यासू स्वभाव आणि प्रशासकीय कौशल्य पक्षाला उपयुक्त ठरेल," असे त्यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांची भाजपमधील प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू, आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे. महाराष्ट्रात पक्षाला मजबूत करण्यात त्यांना यश मिळाले आहे.
"त्यांचे आर्थिक आणि सामाजिक धोरणांचे यश, राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक आणि केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा यामुळे त्यांचे स्थान दृढ आहे," असे विश्लेषण ठाकरे यांनी केले आहे. शेवटी, "भविष्यात त्यांना देशाच्या राजकारणात आणि त्यांच्या मनातील योजनांत यश मिळो, ही मनःपूर्वक शुभेच्छा!" अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications