एकनाथ शिंदेंचा राज्यपालांकडे राजीनामा! 14 वी विधानसभा विसर्जित, आता देवेंद्र फडणवीस नवे मुख्यमंत्री?
Chief Minister Eknath Shinde's resignation : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवस उलटल्यावर आज एकनाथ शिंदे यांनी राजभवनात दाखल होत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमिवर आज एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा सादर केला.

राजभवनात काय घडलं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी 11.15 च्या दरम्यान राजभवन गाठलं. यावेळी त्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला, तरी जोपर्यंत नवीन सरकार येत नाही, तोपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. शिंदे यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते. राजीनामा देण्यासाठी जाण्यापूर्वी शिंदे यांनी आपल्या पक्षातील सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला.
सरकार स्थापनेचा दावाच नाही
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजभवनात जाऊन त्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे तो दिला. मात्र, यावेळी महायुतीकडून अद्याप राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला नाही. एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या सरकारमध्ये त्यांच्याकडे काय जबाबदारी असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महायुती सरकार हे सरकार स्थापनेचा दावा नेमका कधी करणार याकडे आता लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्रिपद नेमकं कुणाला?
महायुतीने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. आता महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे. अद्याप महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यातच आता मुख्यमंत्रिपद पदरात पाडून घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत.
तर दुसरीकडे भाजपचे अनेक कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आग्रही आहेत. तसेच अजित पवार गटानेही मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडणार हे नक्की होताना दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications