माहीम मतदारसंघात अमित ठाकरेंवरच गुलाल; भाजप नेत्याच्या दाव्याने महायुतीत वादाची ठिणगी?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहीम विधानसभा मतदारसंघात सुरू असलेला तिढा अद्याप सुटण्याचे नाव घेत नाही. माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांनी अर्ज भरला आहे. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे महायुतीकडून सदा सरवणकर यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव निर्माण करण्यात येत आहे. अशातच भाजप नेत्याने आम्ही अमित ठाकरेंचे काम करणार आहोत, येथे अमित ठाकरेंवरच गुलाल उधळणार असे म्हटल्याने महायुतीत वादाची ठिणगी पेटली आहे.
काय म्हणाले प्रसाद लाड
प्रसाद लाड म्हणाले, अमित ठाकरे आम्हाला मुलाप्रमाणे आहे. आम्ही अमित ठाकरेंचा प्रचार करणार. अमित ठाकरेंना आम्ही निवडून आणणार आहोत, त्यामुळे सदा सरवणकर यांना माघार घ्यावीच लागणार आहे. त्यांना आम्ही तशी विनंती करु.

उद्या वाट पाहू नाहीतर अमितला पाठिंबा
प्रसाद लाड म्हणाले, सदा सरवणकर उमेदवारी अर्ज माघार घेतील, असे आम्हाला वाटते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना समजावतील. पण आम्ही मनसेला मदत करू. मनसेने आम्हाला मदत केली आहे, त्यामुळे उद्या आम्ही चार वाजेपर्यंत वाट बघू, अशी भूमिका प्रसाद लाड यांनी मांडली आहे.
सरवणकरांची मनसेला अट
सदा सरवणकर यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अट ठेवली आहे. सदा सरवणकर म्हणाले, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. मनसेने महायुतीच्या विरोधात सगळ्याच ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे महायुतीविरोधात उभे केलेले मनसेने उमेदवार मागे घ्यावेत. त्यानंतर मी पक्षासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार आहे. मी पक्षासाठी त्याग करण्यास तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.












Click it and Unblock the Notifications