अकोला 'पूर्व'मध्ये तिरंगी लढत! महायुती, 'वंचित', महाविकास आघाडीत सामना, रणधीर सावरकर गड राखणार का?
Akalo East Assembly Election : अकोला पूर्व हा विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी भारिप बमसं म्हणजे आताच्या वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला होता. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, ग्रामपंचायती या ठिकाणीही वंचितचे वर्चस्व होते. पण, मागील दोन टर्म या ठिकाणी भाजपचे रणधीर सावरकर यांनी विजय मिळवत वंचितच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. हा गड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी वंचितकडून प्रयत्न सुरू आहेत.
भाजप पुन्हा एकदा सावरकर यांना मैदानात उतरवणार आहे. नवीन राजकीय समीकरणात महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कॉंग्रेस, ठाकरे गट की राष्ट्रवादी शरद पवार गट यापैकी कुणाच्या वाट्याला जाणार आहे, हे अद्याप ठरले नाही. परंतु ठाकरे गट प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होऊ शकते.

मतदारसंघाचा इतिहास
अकोला पूर्व हा विधानसभा मतदारसंघ पूर्वी बोरगावमंजू म्हणून ओळखला जात होता. त्यावर काँग्रेस पक्षाचे अधिराज्य होते. 1985 साली वसंतराव धोत्रे यांच्यानंतर या मतदारसंघाने काँग्रेसकडे पाठ फिरवली. नंतर भारिप अर्थात वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघात चांगली पायरोवणी केली. काँग्रेसच नव्हे तर विरोधकांच्या नाकात दम आणला. 35 वर्षंपासून काँग्रेसला या ठिकाणी यशाची अपेक्षा आहे.
1990 च्या निवडणुकीत शिवसेनेने या मतदारसंघात चंचुप्रवेश केला. गजानन दाळू गुरुजी यांनी या निवडणुकीत विजय प्राप्त केला. 1995 साली गुलाबराव गावंडे यांनी सेनेसाठी ही जागा राखली. त्यानंतर 1999 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने भारिपसोबत युती केली. डॉ. दशरथ भांडे विजयी झाले.
भारिपकडून ते लढले होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्येच सामील झाले, परंतु यामुळे काँग्रेससोबत असणारा मोठा समाज भारिपसोबत गेला. त्याचे परिणाम नंतरच्या निवडणुकीतून दिसून आले. काँग्रेसी पंजाचा आधार घेऊन भारिपने आपली ताकद अधिक मजबूत करून घेण्यात यश मिळवले.
काँग्रेस, वंचितची व्होट बँक
काँग्रेसची परंपरागत व्होट बँक भारिपने काबीज केली. हिंदुत्ववादी मतांच्या विभाजनाचाही लाभ त्यांना झाला. 2004 च्या निवडणुकीत भारिपचे हरिदास भदे, शिवसेनेचे श्रीरंग पिंजरकर, काँग्रेसचे विजय मते पाटील, अपक्ष म्हणून विजय मालोकार रिंगणात होते. भदे विजयी झाले. 2009 च्या निवडणुकीत भदे, गुलाबराव गावंडे, विजय मालोकार यांच्यात लढत होऊन पुन्हा हरिदास भदे निवडून आले.
मागील दोन निवडणुकीत मात्र भाजपने भारिपला मात दिली. 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे रणधीर सावरकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे भदे हरिदास पंढरी यांचा 24723 मतांनी पराभव करून जागा जिंकली. यावेळी भाजपकडून सावरकरच मैदानात असणार आहेत. दरम्यान, भारिपच्या तिकिटावर दोन वेळा विजयी झालेले भदे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस मार्गे शिवसेनेच्या ठाकरे गटात गेले.
वंचित बहुजन आघाडीकडून कोण?
Akalo East Assembly Election वंचित बहुजन आघाडीकडे मतदार संघात कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. जिल्हाध्यक्ष प्रल्हाद देंडवे आणि नीलेश देव हे प्रमुख दावेदार आहेत.
महाविकास आघाडीचा उमेदवार कोण?
माजी आमदार भदे यांनी उमेदवारीच्या अटीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारी केली आहे. पण, पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर हेही प्रबळ दावेदार आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव गावंडे हेही इच्छुक आणि दावेदार आहेत.
असा आहे मतदार संघ
2008 नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अकोला पूर्व मतदारसंघात अकोला महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. 8 ते 12, 31 ते 37, 54 आणि 55, आकोट तालुक्यातील कुटासा आणि चोहोट्टा ही महसूल मंडळे आणि आकोला तालुक्यातील महसूल मंडळे - घुसर, पळसो बुद्रुक, बोरगाव मंजू, कापशी, अकोला, उमरी प्रागणे बाळापूर (सीटी) आणि मलकापूर (सीटी) यांचा समावेश होतो.
जातीय समिकरणं
मराठा-कुणबी मतदारांची संख्या अधिक आहे. पाठोपाठ दलित, ओबीसी मतदार आहेत. त्यामुळे येथे मराठा ओबीसी हा फॅक्टर काही अंशी चालेल तरीही काँग्रेस आणि वंचितला यंदा फायदा मिळू शकतो. सावरकर यांनी या मतदारसंघात पाच वर्षांत रस्ते, सांडपाण्याच्या नाल्या या कामांवर अधिक भर दिला. विकास कामांपेक्षा सुखदुःखप्रसंगी गाठीभेटी कोण अधिक घेतो, या मतदारसंघातील फ्लस पॉइंट ठरणार आहे. (Akalo East Assembly Election)












Click it and Unblock the Notifications