मोठी बातमी ! कोकाटेंचे कृषीमंत्रीपद अजित पवारांकडे? हालचाली वाढल्या...
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. विधानभवनात रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा कोकाटे यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली आहे, तसेच अजित पवार यांनी स्वतः हे कृषी खाते सांभाळावे अशी विनंतीही केली आहे.

कोकाटे शेतकऱ्यांच्या विरोधात बोलतात, रोहित पवारांचा आरोप
माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलले जाणार असल्याची चर्चा सुरू असताना, आमदार रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात विधाने करत आहेत. विधानमंडळात त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे, तिथे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी ते पत्ते खेळत होते, हे अत्यंत चुकीचे आहे. पत्ते घरी खेळा."
अजितदादांनी कृषी खात्याची जबाबदारी घ्यावी: रोहित पवारांची विनंती
रोहित पवार पुढे म्हणाले की, कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत अहंकाराने बोलले. त्यांनी शेतकऱ्यांना भिकारी म्हटले, सरकारलाही भिकारी म्हटले. "तुमच्या कृत्यांमुळे तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल. तुमचे नेते याबाबत काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल. अजित दादांना माझी विनंती आहे, कोकाटेंचं खातं बदला आणि तिथे चांगल्या व्यक्तीला संधी द्या. नाहीतर, तुम्हीच तिथे कृषी खात्याची जबाबदारी सांभाळा," अशी मागणी रोहित पवारांनी केली.
आजचे भाजप आणि मित्र पक्षाचे नेते स्वतःला काहीही समजतात, दादा तर एका पक्षाचे प्रमुख झाले आहेत. "तुमचे मंत्री अशा पद्धतीने वागत असतील तर, दादांचे स्वतःवर नियंत्रण आहे पण त्यांच्या मंत्र्यांवर नियंत्रण नाही असे म्हणायचे का?" असा प्रश्नही रोहित पवारांनी अजित पवारांना विचारला आहे.
'राजीनामा देण्यासारखं काय घडलंय?' - माणिकराव कोकाटे
विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केल्यानंतर, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावर आपली बाजू मांडली. ते म्हणाले, "राजीनामा देण्यासारखं काय घडलंय? मी काही विनयभंग केला आहे का? चोरी केली आहे का? माझी काही गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाही. मी केलंय तरी काय? ज्या विरोधकाने हा व्हिडिओ काढला, त्याला मी कोर्टात खेचणारच आहे. साधा पाय घसरला तरी त्याची चर्चा होते. प्रतिक्रिया सुरू होतात. दारू प्यायला असेल, गांजा प्यायला असेल अशा काहीही सोशल मीडियात प्रतिक्रिया येतात."












Click it and Unblock the Notifications