मोठी बातमी ! आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच हॉटेलमध्ये? भेटीबाबत सस्पेन्स कायम...
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नव्या चर्चेला उधाण आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे मुंबईतील एकाच हॉटेलमध्ये एकत्र असल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती, त्यामुळे आता या दोघांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे मुंबईतील सॉफिटेल हॉटेलमध्ये होते. गेल्या काही काळापासून ठाकरे कुटुंब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटीगाठी वाढल्या आहेत, ज्यामुळे ही ताजी घटना चर्चेचा विषय बनली आहे. या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमुळे राजकारणात काहीतरी नवं समीकरण तयार होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे सॉफिटेल हॉटेलमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आले होते. महत्त्वाचं म्हणजे, या दोघांमध्ये कोणतीही थेट भेट झाली नसल्याचंही सूत्रांनी स्पष्ट केलं आहे, ज्यामुळे भेटीबाबतचा सस्पेन्स कायम आहे.
फडणवीसांनी ठाकरेंना दिली होती ऑफर
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका परिषदेत शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची खुली ऑफर दिली होती. "उद्धवजी, २०२९ पर्यंत काहीही स्कोप नाही, आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही, तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा, स्कोप आहे. ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू. ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष आहे," असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना थेट सत्तेत येण्याची विनंती केली होती.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
या ऑफरवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, "सभागृहात या गोष्टी खेळीमेळीने झाल्यात आणि त्या गोष्टी खेळीमेळीनेच घ्यायला हव्यात."
उद्धव ठाकरे-फडणवीसांची झाली होती भेट
विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दालनात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले होते की, "'हिंदी सक्ती हवीच कशाला' या लेखाचा संग्रह प्राप्त झाला. ठाकरेंनी काल दिलेलं पुस्तक मी वाचलं. कुणी कुणाला भेटलं म्हणजे युतीसाठी भेटलं असं होतं नाही."
सध्याच्या परिस्थितीत, फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची एकाच हॉटेलमधील उपस्थिती केवळ योगायोग होती की यामागे काही राजकीय संकेत दडलेले आहेत, हे येणारा काळच सांगेल.












Click it and Unblock the Notifications