का साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिवस? या वर्षी 'ही' भूमिका ठरेल चर्चेचा विषय
World Population Day जेव्हा लोकसंख्येची गोष्ट होते, तेव्हा आपली विचारसरणी सामान्यतः आकड्यांपुरती, ग्राफ्स किंवा संसाधनांवरील ताणतणावांपुरतीच मर्यादित असते. पण खरी गोष्ट त्यापेक्षा खूप पुढे आहे. कारण लोकसंख्या ही केवळ आकड्यांची गोष्ट नसून ती ठरवते की जगातील प्रत्येक व्यक्तीला कितके हक्क, संधी आणि जबाबदाऱ्या मिळणार आहेत.

प्रत्येक वर्षी 11 जुलै रोजी साजरा केला जाणारा जागतिक लोकसंख्या दिवस ही याच गहन विचारसरणीची आणि आंतरराष्ट्रीय चिंतनाची खूण आहे. पण 2025 चा लोकसंख्या दिवस काहीसा वेगळा ठरणार आहे. यंदा लक्ष केंद्रीत आहे वाढत्या लोकसंख्येवर नव्हे, तर तरुण पिढीच्या अधिकारांवर, निर्णयक्षमतेवर आणि स्वप्नांवर.
2025 ची थीम: Empowering young people to create the families they want in a fair and hopeful world ही थीमच स्पष्ट करते की आता वेळ आली आहे की तरुण केवळ लोकसंख्येचा भाग नसून, नीतीनिर्मितीच्या केंद्रस्थानी असायला हवेत.
UNFPA (United Nations Population Fund) च्या ताज्या अहवालानुसार, सध्या जगात इतिहासातील सर्वात मोठी तरुण लोकसंख्या अस्तित्वात आहे. हीच पिढी भविष्यात जगाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक वाटचालीचं नेतृत्व करणार आहे. दुर्दैवाने, यातील कोट्यवधी तरुण अजूनही असे कुटुंब निर्माण करू शकलेले नाहीत, ज्यांची त्यांनी कल्पना केली होती - लग्नासारखे निर्णय घेणे किंवा मूल जन्माला घालणे अशा गोष्टींसाठीही ते स्वतंत्र नाहीत.
UNFPA-YouGov चे जागतिक सर्वेक्षण काय सांगते?
14 देशांतील 14,000 तरुणांशी संवाद साधण्यात आला. यातील बहुतेकांनी सांगितलं की, त्यांना अधिक मूलं हवीत, पण सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक अडचणी यामध्ये मोठा अडसर ठरतात.
जागतिक लोकसंख्या दिवसाची सुरुवात कशी झाली?
11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्जांवर पोहोचली. या ऐतिहासिक दिवसाला Day of Five Billion म्हटलं गेलं. ही झपाट्याने वाढती लोकसंख्या पाहून जगभरातील नेत्यांचं, शास्त्रज्ञांचं आणि नागरिकांचं लक्ष वेधलं गेलं.
1989 मध्ये UNDP (United Nations Development Programme) ने या दिवसाला वार्षिक स्वरूपात साजरं करण्याचा प्रस्ताव दिला. त्यानंतर 1990 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने याला औपचारिक मान्यता दिली आणि 90 हून अधिक देशांनी 11 जुलै हा दिवस पहिल्यांदा साजरा केला.
यावर्षीची थीम का महत्त्वाची आहे?
"Empowering young people to create the families they want in a fair and hopeful world" - या घोषवाक्यातून एक स्पष्ट संदेश दिला जातो की, आजच्या तरुणांना स्वतंत्रपणे विवाह, मूल आणि कुटुंबनिर्मितीचे निर्णय घेता येणं आवश्यक आहे.
UNFPA च्या रिसर्चनुसार, 14 देशांतील तरुणांनी सांगितलं की त्यांना मूलं हवीत, पण आर्थिक असुरक्षितता, आरोग्य सेवांचा अभाव, हवामान संकट आणि लिंग असमानता या गोष्टी मोठी अडथळा ठरत आहेत.
लोकसंख्येचे बदलते ट्रेंड
- 1970 मध्ये एका महिलेला सरासरी 4.5 मुलं होत होती.
- 2015 पर्यंत ही दर 2.5 पेक्षा कमी झाली.
- 1990 च्या सुमारास सरासरी आयुर्मान 64.6 वर्षे, तर 2019 पर्यंत ते 72.6 वर्षांपर्यंत पोहोचले.
- 2007 मध्ये प्रथमच शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक झाली.
- 2050 पर्यंत अंदाज आहे की 66% लोकसंख्या शहरांमध्ये राहील.
वाढती लोकसंख्या आणि आव्हान
या आकड्यांचा परिणाम केवळ जनगणनेपुरता मर्यादित नाही. आरोग्य, शिक्षण, रोजगार, अन्न सुरक्षतेपासून ऊर्जा आणि पर्यावरणीय संतुलनावरही याचा थेट परिणाम होतो. योग्य नियोजन न केल्यास ही एक जागतिक आपत्ती बनू शकते.
या दिवसाचे खरे महत्त्व काय?
जागतिक लोकसंख्या दिवस हा केवळ भाषणांचा किंवा घोषणांचा दिवस नसून, मानवता, समानता आणि शाश्वत भविष्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. जेव्हा तरुण सशक्त होतील, महिला सुरक्षित होतील आणि कुटुंब नियोजन सेवा सर्वांसाठी उपलब्ध होतील तेव्हाच आपण एक न्याय्य, आशावादी आणि शाश्वत जग उभं करू शकतो.
या World Population Day 2025 दिवशी, आपण सर्वांनी एकत्र येऊन हे ठरवूया - लोकसंख्येला नाही, तर अधिकारांना आणि संधींना चालना देऊया. कारण एक जागृत आणि सशक्त समाजच खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाची खरी पायाभरणी करू शकतो.












Click it and Unblock the Notifications