डोनाल्ड ट्रम्प यांनी खळबळच उडवली; टेरिफ म्हणजे काय? कोणत्या देशांवर होणार परिणाम? वाचा प्रकरण...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्विकारल्यापासून जगाविरुद्ध टॅरिफ वॉर सुरू केला आहे. या टॅरिफ वॉरमध्ये त्याने अमेरिकेच्या मित्र देशांनाही सोडले नाही. अमेरिकेचे परस्पर शुल्क बुधवारपासून (२ एप्रिल) लागू करण्यात आले. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर जगात टेरिफवर चांगल्याच चर्चा सुरु झाल्या. जागतीक बाजारपेठेत यामुळे चांगलीच खळबळ उडाली. याच टेरिफ स्किमबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

टॅरिफ स्कीम म्हणजे काय?
ट्रम्प यांनी अमेरिकेच्या निर्यातीवर इतर देशांनी लादलेल्या शुल्क आणि व्यापार धोरणांचा आढावा घेण्याची योजना १३ फेब्रुवारीला जाहीर केली. यालाच त्यांनी एक निष्पक्ष आणि परस्पर टॅरिफ योजना म्हटले. अमेरिकन वस्तूंना इतर देशात जेवढे शुल्क लावले जाते तेवढेच शुल्क अमेरिका इतर दाशांतील वस्तूंना लावेल, असा ही योजना आहे. ट्रम्प यांनी असा युक्तिवाद केला आहे की अनेक अमेरिकन व्यापारी भागीदारांनी अमेरिकन वस्तूंवर जास्त शुल्क कायम ठेवून कमी अमेरिकन टॅरिफ दरांचा फायदा घेतला आहे.
जगावर होणार वाईट परिणाम
ट्रम्प यांच्या या निर्णयाचा आफ्रिका, लॅटिन अमेरिका, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियातील विकसनशील देशांच्या बाजारपेठांच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. विकसनशील देशांतर्गत उद्योगांचे संरक्षणासाठी अनेक देशांमध्ये विदेशी वस्तूंवर जास्त कर लावण्यात आले आहेत. परंतु आता डोनाल्ड ट्रम्प यांनीही अमेरिकेत त्या देशांच्या वस्तूंवर तेवढेच कर लावण्याची घोषणा केल्याने, या देशांच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होणार आहे. ट्रम्प यांचे घोषित ध्येय म्हणजे अमेरिकेची व्यापार तूट कमी करणे आणि त्याचबरोबर देशांतर्गत उद्योग आणि अमेरिकन उत्पादकांची स्पर्धात्मकता वाढवणे, असे आहे. भविष्यातील कर कपातीसाठी त्याला दरांचा वापर करायचा आहे. परंतु त्याने जगातिल इतर बाजारपेठांवर परिणाम होणार आहे.
सर्वाधिक व्यापार तूट कोठे?
अमेरिकेची व्यापार तूट जगात सर्वात जास्त आहे. २०२३ च्या आकडेवारीनुसार अमेरिकेने त्या वर्षी निर्यातीपेक्षा १.१ ट्रिलियन डॉलर्स जास्त आयात केली. २०१९ पासून अमेरिकेची व्यापार तूट सातत्याने वाढत आहे आणि आता सलग चार वर्षांपासून ती १ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. २०२३ च्या आकडेवारीनुसार दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापार तूट असलेला देश म्हणजे युनायटेड किंग्डम. ज्याची व्यापार तूट २७१ अब्ज डाॅलर आहे. त्यानंतर भारताचा व्यापार तूट २४१ अब्ज डाॅलर आहे. फ्रान्सची व्यापार तूट १३७ अब्ज डाॅलर आहे.
कोणत्या देशांसोबत सर्वात जास्त तूट?
गेल्या वर्षीचा विचार केला तर, अमेरिकेची ९२ देशांसोबत व्यापार तूट होती. तर १११ देशांसोबत व्यापार अधिशेष होता. अमेरिकेची तीन प्रमुख आर्थिक भागीदारांसह सर्वात मोठी व्यापार तूट आहे ती म्हणजे चीन, मेक्सिको आणि व्हिएतनाम. २०२४ मध्ये अमेरिका-चीन तूट २९५ अब्ज डॉलर्स, अमेरिका-मेक्सिको तूट १७२ अब्ज डॉलर्स आणि अमेरिका-व्हिएतनाम तूट १२३ अब्ज डॉलर्स होती. सात वर्षांपूर्वी चीनवर कर लादण्यात आले असूनही, अमेरिकेचा चीनसोबतचा सर्वात मोठा द्विपक्षीय व्यापार तूट अजूनही कायम आहे.
अमेरिकेत सर्वात कमी दर का?
अमेरिकेचे अध्यक्ष हर्बर्ट हूवर यांनी १९३० मध्ये स्मूट-हॉली टॅरिफ कायद्यावर स्वाक्षरी केली. कृषी आणि औद्योगिक आयातीवर व्यापक शुल्क लादून अमेरिकन शेतकऱ्यांचे संरक्षण करणे हा त्यांचा हेतू होता. तथापि अनेक देशांनी प्रत्युत्तरात्मक शुल्क लादले. ज्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था कमकुवत झाली. १९३४ च्या पारस्परिक व्यापार करार कायद्याने अमेरिकन संरक्षणवादापासून दूर जाण्याचे संकेत दिले, ज्यामुळे राष्ट्रपतींना परदेशी सरकारांशी कमी दरांवर वाटाघाटी करण्याची परवानगी मिळाली आणि अधिक उदारमतवादी जागतिक व्यापाराचे दरवाजे उघडले.












Click it and Unblock the Notifications