एकाच वेळी 2 देशांचा कारभार? ट्रम्प यांचा मास्टरस्ट्रोक, स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती
International Crisis Update : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका नव्या सोशल मीडिया पोस्टद्वारे संपूर्ण जगाला थक्क केले आहे. 'ट्रुथ सोशल'वर ट्रम्प यांनी स्वतःला वेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष' घोषित केले असून, यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठा भूकंप आला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या 'ऑपरेशन एब्सोल्यूट रिझॉल्व्ह'मध्ये अमेरिकन सैन्याने वेनेझुएलाचे हुकूमशहा निकोलस मादुरो यांना सत्तेवरून खेचून अटक केली. यानंतर आता ट्रम्प यांनी वेनेझुएलाची सत्ता थेट आपल्या हातात असल्याचे संकेत दिले आहेत. एका व्यक्तीकडे एकाच वेळी दोन देशांचे राष्ट्राध्यक्षपद राहू शकते का? या कायदेशीर पेचप्रसंगातही ट्रम्प यांनी आपली 'अमेरिका फर्स्ट' नीती वेनेझुएलापर्यंत विस्तारली आहे.
नेमकी घटना काय?
११ जानेवारी २०२६ रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी वेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वतःचा प्रोफाईल फोटो शेअर केला. जोपर्यंत वेनेझुएलामध्ये लोकशाही मार्गाने सत्तांतर होत नाही, तोपर्यंत आपण तिथे 'कार्यवाहक प्रमुख' म्हणून काम पाहू, असे त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे संयुक्त राष्ट्रे (UN) आणि जागतिक नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेचे वर्चस्व
या संपूर्ण संघर्षाच्या केंद्रस्थानी वेनेझुएलातील अफाट तेल साठा आहे.
आर्थिक नियंत्रण: ट्रम्प यांनी 'राष्ट्रीय आणीबाणी' घोषित करून वेनेझुएलाचा तेल महसूल अमेरिकेच्या नियंत्रणात घेतला आहे.
मोठी कमाई: सुमारे ५० दशलक्ष बॅरल कच्चे तेल रिफाइन करून विकण्याची अमेरिकेची योजना असून, त्यातून सुमारे ३५,००० कोटी रुपयांचा नफा मिळवण्याचे उद्दिष्ट आहे.
लष्करी ताकद: अमेरिकन नौदलाने आधीच वेनेझुएलाचे अनेक ऑइल टँकर्स आपल्या ताब्यात घेतले आहेत.
ट्रम्प यांना व्हाईट हाऊस सोडावे लागेल का?
अमेरिकन राज्यघटनेतील 'इमोल्युमेंट्स क्लॉज' नुसार, कोणताही राष्ट्राध्यक्ष पदावर असताना परदेशी सरकारचे पद स्वीकारू शकत नाही. मात्र, तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांचा हा दावा कायदेशीरपेक्षा अधिक 'कूटनीतिक' आहे. त्यांना व्हाईट हाऊस सोडण्याची गरज नाही, कारण ते स्वतःला वेनेझुएलाचे प्रशासक मानत आहेत, राष्ट्राध्यक्ष म्हणून पगार घेणारे कर्मचारी नव्हे.
निकोलस मादुरो यांचे काय झाले?
३ जानेवारी २०२६ रोजी अमेरिकन स्पेशल फोर्सेसनी कराकसमध्ये गुप्त मोहीम राबवून मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केली. त्यांना सध्या न्यूयॉर्कमधील तुरुंगात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर 'नार्को-टेररिझम'चे गुन्हे दाखल आहेत.












Click it and Unblock the Notifications