Russian plane crash : रशियात भीषण विमान अपघात, 50 जण जळून खाक, कसा घडला अपघाताचा थरार?
Russian plane crash News : अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर आता विमानाने प्रवास करण्याची भीती लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. विमान प्रवासात कधी काय होईल, यावर आता चिंता व्यक्त केली जात आहे.
अशातच, आणखी एका भीषण विमान अपघाताची घटना समोर आली आहे. 50 प्रवाशांना घेऊन जाणारे एक रशियन प्रवासी विमान गुरुवारी (दि. २४) बेपत्ता झाले होते, परंतु, आता ते कोसळल्याची दुःखद माहिती समोर आली आहे. तर या विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची देखील पुष्टी काही माध्यमांकडून करण्यात आली.
चीनच्या सीमेजवळील अमूर प्रदेशात ही घटना घडली असून, विमानाच्या अवशेषांची नोंद झाली आहे. या घटनेमुळे रशियासह जगभरात चिंता व्यक्त केली जात असून पुन्हा एकदा अहमदाबाद विमान अपघाताची पुनरावृत्ती झाल्याचे बोलले जात आहे.

(Image source- AI generated)
काय घडलं नेमकं?
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अंगारा एअरलाइन्सचे हे प्रवासी विमान चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहराकडे जात होते. विमानात 50 जण होते. या विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी (Air Traffic Control) अचानक संपर्क तुटला आणि ते रडारवरून गायब झाले.
त्यानंतर तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. रशियन वृत्तसंस्था इंटरफॅक्स यांच्या माहितीनुसार, रशियाचे An-24 हे प्रवासी विमान टिंडा विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला नाही. दुसऱ्या प्रयत्नासाठी ते आकाशात फिरत असतानाच अचानक बेपत्ता झाले.
प्रादेशिक गव्हर्नर वसिली ऑर्लोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या अंदाजानुसार विमानात पाच मुलांसह 43 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते.
पायलटच्या चुकीमुळे अपघात?
'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातामागे पायलटची चूक असल्याचा प्राथमिक अहवालात दावा करण्यात आला आहे. दुसऱ्यांदा लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना, खराब हवामानामुळे पायलटकडे स्पष्ट दृष्यमानता नव्हती.
याच कारणामुळे हा अपघात घडला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. टिंडा विमानतळ अधिकाऱ्यांनीही पायलटच्या दुसऱ्या लँडिंग प्रयत्नावेळी काहीतरी चुकीची शंका असल्याचे म्हटले आहे.
50 वर्षे जुनं होतं विमान
सायबेरियातील अंगारा एअरलाइन्सचे हे विमान सुमारे 50 वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या शेपटीच्या क्रमांकावरून ते १९७६ मध्ये तयार करण्यात आले होते हे स्पष्ट होते. बचाव पथक हेलिकॉप्टरच्या मदतीने विमानाचा शोध घेत असताना, त्यांना विमानाचा पुढचा भाग जमिनीवर जळताना दिसला. हा अवशेष दिसताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे जुन्या विमानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पुढील तपास सुरू
या विमान अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स आणि इतर तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले जाईल. या दुर्घटनेतील मृतांबद्दल आणि जखमींबद्दल अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.












Click it and Unblock the Notifications