इस्त्रायलने परमानु बाँम्ब बनविणाऱ्या शास्त्रज्ञाला का मारले? या हत्येची अजूनही चर्चा का होते? वाचा
इराणच्या सर्वोच्च अणुशास्त्रज्ञाची २०२० मध्ये हत्या झाली होती. या हत्येनंतर जगभरात खळबळ उडाली होती. २७ नोव्हेंबर २०२० रोजी दिवसाढवळ्या मोहसीन फखरीजादेहची हत्या करण्यात आली. ही घटना ज्या पद्धतीने घडवली गेली ते स्वतःच आश्चर्यकारक तंत्रज्ञानाचे उदाहरण होते. अलिकडच्याच एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, फखरीझादेहची हत्या किलर रोबोट मशीनगनने करण्यात आली होती. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अनेक कॅमेरे वापरले गेले होते. इराणच्या या शास्त्रज्ञाची हत्या का करण्यात आली? हेच आपण पाहूयात...

कशी झाली होती हत्या?
फखरीझादेह यांना इराणच्या अणुकार्यक्रमाचे जनक म्हटले जाते. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादवर त्यांच्या हत्येचा आरोप आहे. अहवालांमध्ये असा दावा केला आहे की, शेकडो मैल दूर असलेल्या अज्ञात ठिकाणाहून उपग्रहाच्या मदतीने मोसादच्या एका स्नायपरने त्याची हत्या केली. फखरीजादेहची गाडी ज्या रस्त्यावरून जात होती तिथे एक ट्रक आधीच त्याची वाट पाहत उभा होता. कॅमेऱ्यांनी सुसज्ज असलेल्या या ट्रकमध्ये एक मशीन गन बसवण्यात आली होती जी फखरीजादेहवर गोळीबार करत होती. अखेर त्यांच्यावर अशा गोळ्या झाडण्यात आल्या की त्यांची हत्या झाली.
हत्येबाबत अनेक शंका?
फखरीजादेह यांची हत्या रिमोट-कंट्रोल्ड मशीनगनने करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. फखरीजादेह यांच्यावर दुसऱ्या कारमधून गोळीबार करून हल्ला करण्यात आला. अहवालानुसार, फखरीझादेह त्यांच्या पत्नीसोबत बुलेटप्रूफ कारमधून प्रवास करत होते आणि त्यांच्यासोबत तीन सुरक्षा वाहने होती, तेव्हा त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला. गोळीचा आवाज ऐकून ते गाडीतून बाहेर पडताच, सुमारे १५० मीटर अंतरावर उभ्या असलेल्या गाडीतून रिमोट-कंट्रोल्ड मशीनगनने गोळीबार केला. फखरीझादेह यांना तीन गोळ्या लागल्या. गोळीबारानंतर त्या गाडीतही स्फोट झाला. तथापि, इराणच्या सरकारी टीव्हीने दावा केला आहे की प्रथम स्फोट झाला आणि नंतर फखरीजादेह यांना लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला.
कोण होते फखरीझादेह?
२००३ मध्ये बंद झालेल्या देशाच्या अणुबॉम्ब कार्यक्रमाचा गुप्त नेता म्हणून पाश्चात्य आणि इस्रायली गुप्तचर संस्था फखरीझादेह यांना मानतात. इराणवर हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुरू आहे. इराणने अणुऊर्जेपासून शस्त्रे बनवल्याच्या आरोपांचे खंडन केले. २०१८ मध्ये एका सादरीकरणादरम्यान नेतान्याहू यांनी इराणवर अण्वस्त्रे विकसित करण्याचा आरोप करताना फखरीझादेहचा उल्लेख ठळकपणे केला होता. इराणी अणुशास्त्रज्ञाची अशा प्रकारे हत्या होण्याची ही पहिलीच वेळ नाही. इराणने इस्रायलवर प्रादेशिक शत्रू असल्याचा आरोप केला आहे. इस्त्रायलला अणुऊर्जेच्या क्षेत्रात प्रगती करण्यापासून रोखण्यासाठी अशा हत्या वारंवार केल्या गेल्या.
काय आहे इराण-इस्त्रायल वाद?
१९७९ च्या इराणी क्रांतीपासून, इस्रायलचा नाश करण्याचे आवाहन केले जात आहे. इराणला इस्रायलच्या अस्तित्वावरच आक्षेप आहे. इस्रायलने मुस्लिम भूमीवर चुकीच्या पद्धतीने कब्जा केल्याचा आरोप, त्यांचे कट्टरपंथी धार्मिक नेते करत असतात. याच कारणास्तव इस्रायल देखील इराणला स्वतःसाठी धोका मानतो. त्यांनी नेहमीच इराणच्या अण्वस्त्रांच्या संपादनाला विरोध केला. मध्य पूर्वेतील इराणचा विस्तार त्यांच्या नेत्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
भारतही घेतोय मोसादकडून प्रशिक्षण
मोसाद ही जगातील सर्वात धारदार गुप्तचर संस्थांपैकी एक मानली जाते. एक गुप्तचर संस्था जी कधीही आपले लक्ष्य चुकवत नाही. मोसादने अशा अनेक मोहिमा राबवल्या आहेत ज्यांचा विचार करूनही माणूस थरथर कापतो. मोसादचा यशाचा इतिहास खूपच प्रेरणादायी आहे. हेच कारण आहे की अमेरिका आणि भारतासह जगातील अनेक गुप्तचर संस्था मोसादसोबत प्रशिक्षणासाठी काम करतात आणि अनेक गुप्त मोहिमा राबवतात. भारत गुप्तचर संस्थेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना इस्रायली गुप्तचर संस्थेकडून प्रशिक्षणही देत आहे.












Click it and Unblock the Notifications