आगा खान यांचं भारतासाठी मोठं योगदान, 3255 हून अधिक गावांमध्ये काम
Aga Khan News : मुस्लिमांचे आध्यात्मिक गुरु आगा खान यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. आगा खान यांचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल अशी माहिती त्यांच्या वेबसाईटवरून दिली आहे. आगा खान हे वयाच्या 20 व्या वर्षी इस्माईली मुस्लिमांचे अध्यात्मिक गुरु बनले. रुग्णालयं आणि शाळांना मदत करण्यासाठी आगा खान यांनी कधीही मागेपुढं पाहिलं नाही.
आगा खान यांचे अनुयायी त्यांना इस्लामचे पैगंबर मुहम्मद यांचे वंशज मानतात. हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना आगा खान यांनी त्यांच्या आजोबांना बाजूला करत ईस्माईली मुस्लिमांचे गुरू म्हणून जागा घेतली. आपल्या अनुयायींचा नेता हा नव्या युगाच्या बरोबरीनं चालणारा असावा असं आगा खान यांच मत होत.

धर्मगुरु होण्यासह आगा खान व्यावसायिकही झाले. गरजुंची मदत करण्यासाठी धावून जाणारे धर्मगुरू म्हणून ते सर्वांना परिचित झाले. आगा खान यांनी सांसारिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन यांच्यात संतुलन राखले. त्यांना राज्याचे प्रमुख म्हणून मान्यता मिळाली.
1957 मध्ये राणी एलिझाबेथ यांनी त्यांना महामहिम म्हणून संबोधले. आगा खान यांचे आजोबा, आगा खान तिसरे यांनी त्यांना 1,300 वर्ष जुन्या राजवंशाचा उत्तराधिकारी बनवले. यानंतर फक्त दोन आठवड्यांनी, राणीने त्यांना 'महामहिम' ही पदवी दिली.
19 ऑक्टोबर 1957 रोजी, ते टांझानियातील दार एस सलाम येथे चौथे आगा खान बनले. हे तेच ठिकाण आहे जिथे त्याच्या आजोबांना त्यांच्या वजनाइतके हिरे भेट म्हणून मिळाले होते. आजोबांची काळजी घेण्यासाठी आगा खान यांनी शाळा सोडली होती. मात्र 18 महिन्यांनंतर पुन्हा त्यांनी शाळेत प्रवेश घेतला.
मुस्लिम समुदाय आणि पश्चिमेकडील देशांमध्ये सुसंवाद राखण्याच काम आगा खान यांनी केलं. आगा खान यांची संस्था, 'आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क', गरीब लोकांच्या आरोग्य, निवास आणि शिक्षणासाठी काम करते. बांगलादेश, ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये त्यांच्या नावाने अनेक रुग्णालये बांधण्यात आली. आगा खान यांच्या संपत्तीचे मूल्य किती आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांची संपत्ती अब्जावधींची असू शकते.
भारतातील आगा खान यांच काम?
भारतात, आगा खान यांच्या वतीनं आगा खान रुरल सपोर्ट प्रोग्राम राबवला जातो. त्यांच्या वेबसाइटनुसार, ही संस्था स्थानिक समुदायांना मदत करून गावातील समुदायाच्या प्रगतीसाठी काम करते. ही संस्था गुजरात, मध्य प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रातील 3255 हून अधिक गावांमध्ये काम करते. यामुळे 3.5 दशलक्षाहून अधिक उपेक्षित लोकांचे जीवन बदलले आहे. आगा खान रुरल सपोर्ट प्रोग्रामशी संबंधित 80 टक्क्यांहून अधिक कुटुंबे आदिवासी, दलित आणि अल्पसंख्याक समुदायातील आहेत. 60 टक्क्यांहून अधिक महिला याचा फायदा घेत आहेत.
AKRSP इंडिया म्हणजे आगा खान रुरल सपोर्ट प्रोग्रामने देशात अनेक विकासकामांना हातभार लावला आहे. यासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या संस्थेचे काम ग्रामीण समुदायांचे, विशेषतः वंचित समुदायांचे आणि महिलांचे सक्षमीकरण करणे आहे. ही संस्था सामूहिक आणि वैयक्तिक उद्योगांना प्रोत्साहन देते. शेती, व्यवसाय आणि ग्रामीण प्रशासन अशा उद्योगांना आगा खान यांच्या संस्थेकडून प्रोत्साहन दिले जाते.












Click it and Unblock the Notifications