इराणकडून विश्वासघात, शस्त्रसंधीनंतरही इस्रायलवर हल्ला; अमेरिका आता काय पाऊल उचलेल?
इराण आणि इस्रायलमधील तणाव शांत करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हस्तक्षेप करत युद्धबंदी जाहीर केली होती. त्यांच्या मध्यस्थीनंतर जगाला वाटलं होतं की आता संघर्ष थांबेल आणि शांतता प्रस्थापित होईल. मात्र, सोमवारी सकाळी झालेल्या घडामोडींनी ही अपेक्षा धुळीस मिळाली आहे.

इराणने शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर केवळ काही तासांतच इस्रायलवर पुन्हा हल्ला चढवला. इस्रायलच्या लष्कराच्या माहितीनुसार, देशाच्या मध्य आणि दक्षिण भागांमध्ये क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये स्फोट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या हल्ल्यामुळे अनेक भागांमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धबंदीची घोषणा झाली फोल?
फक्त 24 तासांपूर्वी ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीची औपचारिक घोषणा केली होती. त्यांनी दोन्ही देशांनी शांतता राखण्यावर सहमती दर्शवल्याचं जाहीर केलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे युद्ध अनेक वर्षं चालू शकत होतं, पण त्याआधीच ते थांबवण्यात यश आलं. मात्र इराणच्या या नव्या कृतीमुळे ट्रम्प यांची घोषणाच प्रश्नचिन्हात आली आहे.
इराणचं आक्रमक धोरण कायम, अमेरिकेच्या तळावरही क्षेपणास्त्र हल्ला
केवळ इस्रायलवरच नव्हे, तर कतारमधील अमेरिकी सैन्याच्या तळालाही सोमवारी रात्री इराणकडून लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली की नाही, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र इराणने पुन्हा एकदा अमेरिकेच्या उपस्थितीविरोधात आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे.
अमेरिकेने याआधी इराणमधील फोर्दो, नतांज आणि इस्फान या तीन प्रमुख आण्विक केंद्रांवर हवाई हल्ले करत ते उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता. अमेरिकेला वाटलं होतं की या शक्तीप्रदर्शनामुळे इराण माघार घेईल. पण इराणने या अपेक्षेवर पाणी फिरवत, पुन्हा प्रतिहल्ला करत आपली ताकद दाखवून दिली आहे.
आता अमेरिकेची पुढची रणनीती काय असेल?
इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या प्रतिक्रिया आणि पुढील भूमिका काय असणार याकडे आता जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. शस्त्रसंधीच्या अटी झुगारून इराणने हल्ला केल्यामुळे ट्रम्प प्रशासनावर दबाव वाढला आहे. अमेरिका आता पुन्हा सैनिकी हस्तक्षेप करेल का, की पुन्हा एकदा शांततामध्यस्थीचा मार्ग स्वीकारेल - हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इराण-इस्रायल संघर्ष आणखी गडद होत चालला आहे. शांततेचा मार्ग क्षणिक ठरतोय आणि प्रत्येक क्षणाला युद्धाची तीव्रता वाढण्याची शक्यता निर्माण होते आहे. अशा परिस्थितीत अमेरिका कोणती भूमिका घेते, हे केवळ युद्धाचा नव्हे, तर संपूर्ण मध्यपूर्वेच्या स्थैर्याचा निर्णायक टप्पा असणार आहे.


Click it and Unblock the Notifications
