पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन; कारण काय? वाचा...
मानवी हक्क व लोकशाहीच्या प्रयत्नांसाठी सध्या तुरुंगात असलेल्या पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये स्थापन झालेल्या पाकिस्तान वर्ल्ड अलायन्स (पीडब्ल्यूए) च्या सदस्यांनी या नामांकनाची घोषणा केली.

पार्टीएट सेंट्रमचे म्हणणे काय?
पाकिस्तान वर्ल्ड अलायन्स (पीडब्ल्यूए) व नॉर्वेजियन राजकीय पक्ष पार्टीएट सेंट्रमने हे नामांकन जाहीर केले. या नामांकनाची माहिती त्यांनी एक्सवर पोस्ट करत दिली. त्यात म्हटले आहे की, "पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानमध्ये मानवी हक्क आणि लोकशाहीसाठी केलेल्या कामासाठी नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आनंद होत आहे."
कशासाठी मिळाले नामांकन?
दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी २०१९ मध्ये इम्रान खान यांनी प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नांसाठीच खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आल्याचे सांगण्यात आले. नॉर्वेजियन नोबेल समितीला दरवर्षी शेकडो नामांकने मिळतात. त्यानंतर ते आठ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रक्रियेद्वारे विजेत्याची निवड करतात. पाकिस्तानच्या मुख्य विरोधी पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे संस्थापक असलेले खान यांना ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात टाकण्यात आले आहे. या अधिकाराचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराशी संबंधित एका प्रकरणात खान यांना जानेवारीत १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications