Womens Day 2025: आंतराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात नेमकी कशी झाली? यंदाची थीम काय? जाणून घ्या इतिहास
Women's Day 2025 Theme History : 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातले लोक याच तारखेला महिला दिन का साजरा करतात यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. महिला दिनाच्या या परंपरेला महिलांच्या चळवळीचा, आंदोलनांचा मोठा इतिहास आहे. या सगळ्याची सुरुवात 19 व्या शतकात अमेरिकेमध्ये झाली. 1908 साली अमेरिकेत न्यूयाॅर्कमध्ये एक भव्य मोर्चा निघाला होता. हा महिलांनी महिलांसाठी काढलेला मोर्चा होता. आपल्या कामाचे तास कमी करा, अशी त्यांची प्रमुख मागणी होती.
आपल्याला चांगलं वेतन मिळावं आणि मतदानाचा अधिकार मिळावा याही मागण्या घेऊन या महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. सुमारे 15 हजार महिलांनी या मोर्चात भाग घेतला. या आंदोलनामुळे महिलांचा आवाज साऱ्या जगासमोर आला. त्याची दखल राजकीय पक्षांनाही घ्यावी लागली. यानंतर वर्षभराने सोशलिस्ट पक्षाने 8 मार्च हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला. अमेरिकेमध्ये 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा झाला. नंतर जगभरामध्ये महिला दिनाचा हा आवाज घुमू लागला.

क्लारा जेटकिन यांची संकल्पना
1910 मध्ये कोपनहेगन इथे झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत क्लारा जेटकिन या द्रष्ट्या महिलेने महिला दिनाची संकल्पना मांडली. क्लारा जेटकिन या महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या कम्युनिस्ट कार्यकर्त्या होत्या.
या परिषदेत जमलेल्या 17 देशांच्या प्रतिनिधींनी क्लारा जेटकिन यांच्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. त्यानंतर 1911 साली आॅस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी, स्वित्झर्लंड या देशांमध्ये महिला दिन साजरा करण्यात आला.
1975 साली अधिकृत मान्यता
अमेरिकेनंतर अशा प्रकारे युरोपमध्येही महिला दिन साजरा होऊ लागला पण त्याला अधिकृत मान्यता मिळाली 1975 साली. संयुक्त राष्ट्रांनी 1975 साली आंतरराष्ट्रीय महिला दिनाला मान्यता दिली. या महिला दिनाची थीमही ठरवण्यात आली. Celebrating the past planning for the future अशी ही पहिली थीम होती. 'भूतकाळ साजरा करतानाच भविष्यासाठीची योजना करुया' हा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला.
रशियामध्ये महिलांचं आंदोलन
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा आणखी एक इतिहास आहे. रशियामध्ये 1917 साली महिलांनी 'भाकरी आणि शांतता' अशा दोन मागण्यांसाठी आंदोलन केलं. महिलांच्या या कामबंद आंदोलनाने सम्राट निकोलसला पद सोडायला भाग पाडलं. एवढंच नव्हे तर त्यानंतर आलेल्या सरकारला महिलांना मतदानाचा अधिकारही द्यावा लागला. महिलांच्या या आंदोलनाची आठवण म्हणून 8 मार्च हा आंतराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा होऊ लागला.
यावर्षी महिला दिनाची थीम - 'कृतीला गती देऊया'
यावर्षीही आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम म्हणजेच संकल्पना ठरवण्यात आली आहे. Accelerate action म्हणजेच कृतीला आणखी गती देऊया, अशी ही संकल्पना आहे. महिलांच्या प्रगतीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आखणं, विविध योजनांद्वारे महिलांना प्रगतीची साधनं मिळवून देणं आणि या उपक्रमांना साह्य करणं हा यामागचा उद्देश आहे.
महिला आणि पुरुषांमधला लिंगभेद कमी करून समानतेच्या मार्गाने चालणं हा महिला चऴवळीचा मूळ हेतू आहे. संयुक्त राष्ट्रांनी महिलांच्या या चळवळीला अधिकृत मान्यता दिली त्या घटनेलाही यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं खास महत्त्व आहे.












Click it and Unblock the Notifications