तुमच्या मुलाच्या आधार कार्डचे बायोमेट्रिक्स कधी अपडेट करायचे? जाणून घ्या UIDAIचा नियम!
When to update your childs Aadhaar card biometrics : आज भारतात नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांकडे आधार कार्ड आहे. हे कार्ड काय फक्त मोठ्या व्यक्तिंसाठी नाही, तर मुलांसाठीही एक अत्यंत महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज बनले आहे.
शाळेत प्रवेश घेण्यापासून ते विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत, प्रत्येक ठिकाणी मुलांच्या आधार कार्डची आवश्यकता असते. त्यामुळे आधार कार्ड अतिशय महत्त्वाचे दस्तावेज आहेच.
परंतु, तुम्हाला माहीत आहे का की, लहान मुलांच्या आधार कार्डमध्ये सुरुवातीला बायोमेट्रिक माहिती (उदा. बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन) घेतली जात नाही? याचं कारण म्हणजे लहान वयात मुलांचे बायोमेट्रिक्स पूर्णपणे विकसित झालेले नसतात. ते कधी अपडेट करायचे असतात, त्याची प्रक्रिया काय आहे, योग्य वेळी अपडेट केले नाही तर काय होतात, जाणून घ्या सर्व काही.

बायोमेट्रिक्स अपडेट कधी करावे लागणार?
सुरुवातीला, लहान मुलांसाठी फक्त फोटो आणि इतर सामान्य माहितीच्या आधारे 'बाल आधार' तयार केले जाते. पण, एकदा मुले विशिष्ट वयाची झाली की त्यांचे बायोमेट्रिक्स अपडेट करणे बंधनकारक आहे.
UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) च्या नियमांनुसार, मुलांच्या आधार कार्डमध्ये दोन वेळा बायोमेट्रिक माहिती अपडेट करणे आवश्यक आहे:
पहिल्यांदा, जेव्हा मूल 5 वर्षांचे होते. या टप्प्यावर मुलाचे बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅन घेतले जातात, ज्यामुळे त्याचा आधार रेकॉर्ड अद्ययावत होतो. दुसऱ्यांदा, मूल 15 वर्षे पूर्ण झाल्यावर. या वेळी पुन्हा एकदा संपूर्ण बायोमेट्रिक्स अपडेट केले जातात.
..तर तुमच्या मुलाचे आधार होईल इनअॅक्टिव्ह!
हे अपडेट्स वेळेवर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे! जर तुम्ही हे अपडेट्स केले नाहीत, तर तुमच्या मुलाच्या आधार कार्डची स्थिती 'निष्क्रिय' (inactive) होऊ शकते.
यामुळे भविष्यात हे आधार कार्ड शाळा, महाविद्यालय, बँक किंवा इतर कोणत्याही ठिकाणी वैध राहणार नाही. त्यामुळे, मुलांनी निर्धारित वय पूर्ण करताच त्यांचे बायोमेट्रिक अपडेट करून घेणे अनिवार्य आहे.
बायोमेट्रिक अपडेटची सोपी प्रक्रिया
जर तुमच्या मुलाचे बायोमेट्रिक्स अपडेट करण्याची वेळ आली असेल, तर ही प्रक्रिया खूपच सोपी आहे.
- आधार सेवा केंद्राला भेट: तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्रात जावे लागेल.
- ऑनलाइन अपॉइंटमेंट: तुमचा वेळ वाचवण्यासाठी, तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइट (uidai.gov.in) वरून ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकता.
- फॉर्म भरा आणि बायोमेट्रिक्स द्या: आधार केंद्रावर तुम्हाला एक अपडेट फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर मुलाचा नवीन फोटो, फिंगरप्रिंट्स आणि डोळ्यांचे स्कॅन घेतले जाईल.
शुल्क आकारल्यास करा तक्रार!
सर्वात महत्त्वाचे: बायोमेट्रिक अपडेटसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. जर कोणी यासाठी पैसे मागितले, तर तुम्ही UIDAI च्या टोल-फ्री हेल्पलाइनवर किंवा वेबसाइटद्वारे त्वरित तक्रार करू शकता. तुम्ही UIDAI वेबसाइटवर तुमच्या अपडेटची सद्यस्थिती (स्टेटस) देखील तपासू शकता. या सोप्या प्रक्रियेचे पालन करून, तुम्ही तुमच्या मुलाचे आधार कार्ड नेहमी सक्रिय आणि वैध राहील याची खात्री करू शकता, ज्यामुळे भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही.












Click it and Unblock the Notifications