आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय? ते कुणी तयार केले? कधी मांडणार? जाणून घ्या, सर्व प्रश्नांची उत्तरे
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होईल. उद्या संससदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईल. या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी १६ विधेयकांची यादी तयार करण्यात आली आहे. संसदेला संबोधित करण्यासाठी राष्ट्रपती पारंपारिक बग्गीवरून संसद भवनात पोहोचतील. त्यांचे भाषण ११ वाजता होईल, यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल. मात्र हे आर्थिक सर्वेक्षण काय असते? याची माहिती आपण पाहूयात...

कसे आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आज ११ वाजता लोकसभा व राज्यसभेला संबोधित करतील. त्यांच्या अभिभाषणाने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात होईल. त्यानंतर उद्या नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. सत्राचा पहिला भाग १३ फेब्रुवारी रोजी संपेल आणि दुसरा भाग १० मार्च रोजी सुरू होईल तर, सत्र ४ एप्रिल रोजी संपेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाईल.
आर्थिक सर्वेक्षणाचा इतिहास काय?
पहिले आर्थिक सर्वेक्षण १९५०-५१ मध्ये अस्तित्वात आले. त्यावेळी बजेट म्हणजे कागदपत्रांचा एक भाग असायचे. १९६० च्या दशकात अर्थसंकल्पीय कागदपत्रांपासून वेगळे करण्यात आले आणि केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी सादर केले गेले. त्यामुळे आजच्या आर्थिक सर्वेक्षणात मोदींच्या उर्वरित कार्यकाळासाठी महत्त्वाच्या घोषणा कोणत्या असतील, याकडे लक्ष लागले आहे.
आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय?
आर्थिक सर्वेक्षण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती, विकासाचा दर आणि प्रमुख आर्थिक आव्हानांचे केलेले विश्लेषण असते. १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो त्या्च्या एक दिवस अगोदर म्हणजे आज ३१ जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत करणे आणि देश कोणत्या आर्थिक समस्यांना तोंड देत हे सरकारला व जनतेला समजणे, हाच आर्थिक सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश असतो. आर्थिक सर्वेक्षण गेल्या एका वर्षातील आर्थिक कामगिरीचे तपशीलवार विश्लेषण आणि भविष्यातील संभाव्य धोरणांची माहिती करुन देते.
कुणी तयार केले सर्वेक्षण?
मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांच्या देखरेखीखाली आर्थिक सर्वेक्षण तयार करण्यात आले आहे. आर्थिक सर्वेक्षण सादरीकरणानंतर मुख्य आर्थिक सल्लागार पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे देतील. आर्थिक सर्वेक्षण अहवाल अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाकडून तयार केले जाते. मुख्य आर्थिक सल्लागारांची टीम या अहवालाला अंतिम रूप देते.












Click it and Unblock the Notifications