वडिलांनी हत्या केलेली स्टार टेनिसपटू राधिका यादव कोण होती? हत्येचं धक्कादायक कारण समोर...
हरियाणामधील गुरुग्राम शहरातील 25 वर्षीय राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादवची 10 जुलै रोजी तिच्या वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही अत्यंत हृदयद्रावक घटना गुरुग्रामच्या सेक्टर-57 येथील तिच्या घरात घडली. सकाळी सुमारे 10.30 वाजता दीपक यादव यांनी राधिकावर तीन गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या राधिकाला तत्काळ खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

राधिकाच्या मृत्यूचं कारण काय?
पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली आहे. हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून तपास सुरू आहे. मात्र प्राथमिक माहितीनुसार, राधिकाची टेनिस अकादमी चालवण्यावरून तिचं वडिलांशी सतत वाद होत होता. पोलिसांच्या मते, वडिलांना राधिकाचं टेनिस अकादमी चालवणं पसंत नव्हतं आणि या कारणावरून घरी हमरीतुमरी होत असे.
राधिकाचा टेनिस कारकीर्दीचा आढावा
राधिकाने अतिशय कमी वयात टेनिस खेळायला सुरुवात केली होती आणि काही वर्षांतच ती हरियाणातील टॉप डबल्स टेनिसपटूमध्ये गणली जाऊ लागली. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत आंतरराष्ट्रीय महिला डबल्स आयटीएफ रँकिंगमध्ये राधिकाने 113 वा क्रमांक गाठला होता आणि तिच्याकडे 10 आंतरराष्ट्रीय गुण होते. ती हरियाणामध्ये महिला डबल्समध्ये #5 व्या क्रमांकावर होती.
तसंच AITA अंडर-18 गटामध्येही तिने टॉप 100 मध्ये स्थान मिळवलं होतं, ज्यामध्ये 2018 साली तिने 75 रँकिंग मिळवली होती.
देशाचं नाव उज्वल करू शकल्या असती राधिका
AITA महिला सिंगल्समध्ये राधिकाची सर्वोच्च रँकिंग 35 होती, तर डबल्समध्ये ती 53 पर्यंत पोहोचली होती. तब्बल 112 आठवडे तिने AITA महिला डबल्स टॉप 100 मध्ये आपली जागा कायम ठेवली होती, हे तिच्या सातत्यपूर्ण प्रदर्शनाचं स्पष्ट उदाहरण आहे.
हरियाणामधून AITA टॉप 100 मध्ये पोहोचणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये राधिकाचा समावेश होता. तिच्या कामगिरीवरून हे स्पष्ट होतं की, ती भविष्यात देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच उज्ज्वल करू शकली असती.
ही घटना केवळ कौटुंबिक मतभेदांपुरती मर्यादित नसून, ती एक प्रतिभाशाली महिला खेळाडूच्या अकाली मृत्यूची शोकांतिका आहे. राधिकानी दिलेल्या योगदानाची कधीही भरपाई होऊ शकत नाही.












Click it and Unblock the Notifications