Padma Award 2026: महाराष्ट्राचा डंका! लोकनाट्य, कृषी-कला क्षेत्रातील 4 भूमिपुत्रांना 'पद्म' पुरस्कार
Padma Award List 2026 : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने २०२६ सालच्या प्रतिष्ठेच्या 'पद्म' पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावर्षी देशातील ४५ मान्यवरांना त्यांच्या उल्लेखनिय कार्याबद्दल गौरविण्यात आले असून, यात महाराष्ट्रातील चार कर्तृत्ववान भूमिपुत्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, राज्याच्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेले लोकनाट्य (तमाशा) आणि अन्नदात्याच्या कृषी क्षेत्राला मिळालेला हा बहुमान महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरला आहे.

महाराष्ट्रातील 'पद्म' विजेते: कर्तृत्वाचा गौरव
यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवात भर घालणाऱ्या खालील ४ व्यक्तींचा समावेश आहे.
रघुवीर खेडकर (लोकनाट्य/तमाशा) : लोककलेचा वारसा जपणाऱ्या रघुवीर खेडकर यांना लोकनाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री जाहीर झाला आहे. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचे सुपुत्र असलेल्या खेडकर यांनी तमाशा या लोककलेला आधुनिक काळातही जिवंत ठेवले आहे. दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तमाशा सादर करण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता.
श्रीरंग देवबा लाड (कृषी) : कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे.
भिकल्या लाडक्या ढिंडा (कला - वारली संगीत) : पालघर जिल्ह्यातील वारली संस्कृती आणि संगीत जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे कार्य करणाऱ्या भिकल्या लाडक्या ढिंडा यांना हा बहुमान मिळाला आहे.
आर्मिंदा फर्नांडीस (वैद्यकीय/सामाजिक कार्य) : आरोग्य सेवेतील त्यांचे समर्पित कार्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
लोककलेचा सन्मान: खेडकर घराण्याचे योगदान
रघुवीर खेडकर यांना मिळालेला पुरस्कार हा केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण तमाशा परंपरेचा सन्मान आहे. त्यांच्या मातोश्री विठाबाई नारायणगावकर यांना २००५ मध्ये महाराष्ट्र शासनाचा पहिला जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. आता आईचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या रघुवीर खेडकर यांच्या नावावर केंद्र सरकारची ही मोहोर उमटल्याने कलाविश्वात आनंदाचे वातावरण आहे.
देशातील ४५ मान्यवरांना पद्म पुरस्कार
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ४५ मान्यवरांचा समावेश आहे. यात मध्य प्रदेशातील भगवंदास रायकर, जम्मू-काश्मीरचे ब्रिज लाल भट्ट, ओडिशाचे चरण हेम्ब्रम आणि उत्तर प्रदेशातील चिरंजी लाल यादव यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. शिक्षण, आरोग्य, कला, समाजसेवा आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांत तळागाळात काम करणाऱ्या व्यक्तींची निवड यावर्षी प्रकर्षाने दिसून येते.
पद्म पुरस्कारातील काही महत्त्वाची नावे
- उत्तर प्रदेश : डॉ. श्याम सुंदर, रघुपत सिंह
- गुजरात : नीलेश मंडलेवाला, धर्मिकलाल चूनीलाल पांड्या
- कर्नाटक : अंके गौड़ा, सुरेश हनागवाड़ी
- तामिळनाडू : थिरुवरूर बख्तवसलम, एस. कृष्णन
- ईशान्य भारत : सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालँड), तेची गूबिन (अरुणाचल प्रदेश)












Click it and Unblock the Notifications