Tribute to Manoj Kumar : मनोज कुमार यांचे शिर्डीशी होते अनोखे नाते; साईबाबांवर होती अगाध श्रद्धा
भारत का रहेना वाला हू... भारत की बात सुनाता हू... हे गाणं आठवतंय? ७०-८० च्या दशकात देशप्रेमावर आधारीत चित्रपटाव्दारे घराघरांत पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे आज निधन झाले. मृत्यूसमयी ते ८७ वर्षांचे होते. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांचा मलगा कुणाल गोस्वामी यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर सार्वजनिक केले. कुणाल गोस्वामी यांच्या शोकसंदेशात शिर्डीच्या साईबाबांचा आवर्जून उल्लेख केलाय. कुणाल गोस्वामी म्हणालेत की, ते बराच काळ आजारी होते. पण त्यांनी मोठ्या धैर्याने सर्व गोष्टींचा सामना केला. ही देवाची कृपा आहे, शिर्डीच्या बाबांची कृपा आहे की ते या जगातून शांतपणे निघून गेले. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. साईराम... कुणाल गोस्वामी यांच्या या शोकसंदेशानंतर मनोज कुमार व शिर्डीचे किती जवळचे नाते होते, याची चर्चा सुरु झाली. स्व. मनोज कुमार यांच्या याच शिर्डीच्या अनोख्या नात्याबाबत आज आपण माहिती घेऊ...

साईरत्न पुरस्काराने सन्मान
शिर्डीत तीन वर्षांपूर्वी, म्हणजेच २०२२ साली १११ वा ऐतिहासीक रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात शिर्डी रामनवमी उत्सव समितीने ११ मान्यवरांना साईरत्न पुरस्कार प्रदान केला. या ११ पुरस्कार्थींमध्ये एक नाव होते, ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे... मनोज कुमार यांनी शिर्डीसाठी दिलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे त्यावेळी यात्रा कमेटिच्या वतीने सांगण्यात आले. कारण आज ज्या शिर्डीची जगभर चर्चा होते, त्या शिर्डीची व साईबाबांची खरी ओळख अभिनेते मनोज कुमार यांनीच करुन दिली, असे सांगितले जाते. मनोज कुमार यांनी १९७७ साली 'शिर्डी के साईबाबा' हा चित्रपट प्रदर्शित केला आणि शिर्डीला गर्दी वाढली. या चित्रपटात मनोज कुमार यांनी साईबाबांच्या लिला, त्यांचे चमत्कार आणि त्यांनी केलेले कार्य दाखवले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढली. नुसते महाराष्ट्रातूनच नाही तर जगभरातील भाविक शिर्डीला दर्शनाला येऊ लागले. फकीर समजल्या जाणाऱ्या साईबाबांच्या शिर्डी आज देशातील क्रमांक दोनचे श्रीमंत देवस्थान बनले आहे. शिर्डीला हे वैभव प्राप्त करुन देण्यामागे अभिनेते मनोज कुमार यांचा सिंहाचा वाटा होता, हे नाकारुन चालत नाही.
शिर्डीतील एका रस्त्यालाही नाव
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या 'शिर्डी के साई बाबा' (१९७७) या चित्रपटाने शिर्डीची प्रतिमा खरोखरच बदलली. जगभर शिर्डीचे नाव पसरवून शिर्डी जगविख्यात झाली. २००६ मध्ये श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डीने शिर्डीतील 'पिंपळवाडी' रस्त्याचे नाव बदलून त्या रस्त्याला 'मनोजकुमार गोस्वामी रोड' असे नाव दिले. हे नामकरण करुन शिर्डी देवस्थान ट्रस्टने मनोज कुमार यांचा अनोखा सन्मान केला होता. हा पिंपळवाडी रस्ता शिर्डी साई बाबा मंदिराकडे जाणारा एकमेव रस्ता आहे.
शेवटची भेट ११ वर्षांपूर्वी
अभिनेते मनोज कुमार हे शिर्डीला कित्येकदा आले. ३१ डिसेंबरला म्हणजेच नव वर्षाच्या सुरुवातीला ते शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घ्यायचे. ३१ डिसेंबर २०१४ लाही ते शिर्डीत आले होते. त्यांनी साईबाबा समाधी मंदीरावर माथा टेकवून बाबांचे आशीर्वाद घेतले. आपण जे काही करु शकलो, त्यामागे बाबांचाच आशीर्वाद आहे, असे त्यांनी अनेकदा सांगितले होते. शिर्डीतील भेटीने मला जगण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी मुलाखतीत सांगितले होते.
अनेक हाँटेलचे केले उद्धाटन
साईबाबा इंटरनॅशनल हाॅटेल हे अभिनेता मनोज कुमार यांच्या मालकीचे शिर्डीतील पहिले हाॅटेल होते. त्याच हाॅटेलचे विस्तारीत रुप म्हणजेच हाॅटेल साई धर्म पॅलेसचे उद्धाटन २०१४ ला स्वतः त्यांच्या हस्ते करण्यात आले होते.मनोज कुमार यांचे शिर्डीत दोन हाॅटेल्स आहेत. शिवाय शिर्डीतील इतर अनेक हाँटेलच्या उद्धाटनासाठी अभिनेते मनोज कुमार व अभिनेते दिलीप कुमार हेही अनेकदा आले होते. शिर्डीकरांशी असलेल्या मनोज कुमार यांच्या प्रेमाच्या संबंधामुळे अनेकजण त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करत व मनोजकुमारही अगदी कोणतेही आढेवेढे न घेता शिर्डीत येत असत.












Click it and Unblock the Notifications