खासदार निशिकांत दुबे यांची दिल्लीत कोंडी; 'आपटून मारु' म्हणणारे मराठी खासदारांसमोर नरमले!
महाराष्ट्रात हिंदी भाषेवरून पेटलेला वाद आता थेट देशाच्या राजधानीत, संसदेच्या दारापर्यंत पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी 'महाराष्ट्राबाहेर येऊन दाखवा, तुम्हाला आपटून आपटून मारू,' असे वादग्रस्त विधान करून राज्यातील वातावरण तापवणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांना महाराष्ट्रातील खासदारांनी लोकसभेतच धारेवर धरले. काँग्रेसच्या महिला खासदारांनी त्यांची थेट कानउघडणी केली असता, दुबे यांनी तातडीने नमते घेत, "तुम्ही तर माझ्या बहिणीसारख्या आहात," असे म्हणत काढता पाय घेतला.

वादाचे मूळ काय?
या प्रकरणाची सुरुवात महाराष्ट्रात हिंदी भाषिक अस्मितेवरून सुरू झालेल्या राजकीय संघर्षातून झाली. मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली होती. याच दरम्यान, मीरा-भाईंदरमध्ये एका परप्रांतीय दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. या घटनेनंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी मराठी लोकांच्या उद्योगांवर आणि करयोगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
"तुम्ही कोणाच्या जीवावर जगताय? आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय," असे तारे तोडले होते. इतकेच नव्हे, तर त्यांनी ठाकरे बंधूंना माहिम दर्ग्यातील उर्दू भाषिकांना मारहाण करण्याचे आव्हान देत, "आपल्या घरात कोणीही सिंह असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ...महाराष्ट्राबाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारू," अशी थेट धमकीच दिली होती.
लोकसभेतील नाट्यमय प्रसंग
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना, लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर महाराष्ट्रातील खासदारांनी निशिकांत दुबे यांना गाठण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव या दुबे यांना लॉबीमध्ये येताच घेराव घातला. त्यांनी दुबे यांना स्पष्टपणे विचारले की, मराठी भाषिकांविरोधातील तुमची अरेरावी आम्ही सहन करणार नाही.
तुम्ही कुणाला आणि कसे आपटून मारणार? तुमचे वागणे अत्यंत चुकीचे आहे, अशा शब्दांत त्यांनी दुबे यांना खडसावले. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी जोरदारपणे 'जय महाराष्ट्र' च्या घोषणा दिल्या. महिला खासदारांच्या या आक्रमक भूमिकेसमोर निशिकांत दुबे यांची अवस्था बिकट झाली. त्यांनी हात जोडून, "तुम्ही तर माझ्या बहिणीसारख्या आहात," असे म्हणत तत्काळ तिथून निघून जाणे पसंत केले. यावेळी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीचे अन्य खासदारही उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.
राज ठाकरेंचे चोख प्रत्युत्तर
निशिकांत दुबे यांच्या विधानानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मीरा-रोड येथील एका सभेत त्यांना जबरदस्त प्रत्युत्तर दिले होते. राज ठाकरे म्हणाले होते, "हा दुबे नावाचा कोणीतरी भाजप खासदार म्हणाला, मराठी लोकांना आम्ही पटकून पटकून मारू... त्याच्यावर काही कारवाई झाली का? हिंदी चॅनेलवाल्यांनी हे दाखवले का? काहीही नाही. हे असेच असतात. तू आम्हाला मारणार? अरे दुबे, तू मुंबईत येऊन बघ... मुंबईच्या समुद्रात डुबे डुबे करून मारू!" असे म्हणत त्यांनी निशिकांत दुबे यांना आव्हान दिले होते.
महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा आणि भाषिक राजकारण यामुळे आता संसदेतही महाराष्ट्रातील खासदारांनी एकजूट दाखवून आपला पवित्रा स्पष्ट केला आहे. या घटनेमुळे भविष्यातही अशा भाषिक संघर्षाचे पडसाद उमटत राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.












Click it and Unblock the Notifications