कथा व कल्पनाशक्तीचा संगम; नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळाव्यात 'किड्झ एक्सप्रेस'चा आनंददायी प्रवास!
Kidz Express New Delhi World Book Fair 2026 : "वाह! पहा-आपण खरोखरच एका ट्रेनच्या आत आहोत!" हा उद्गार आहे त्या हजारो मुलांपैकी एकाचा, ज्यांनी यंदाच्या नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळाव्यातील (१०-१८ जानेवारी २०२६) सर्वात आकर्षक केंद्रबिंदू असलेल्या 'किड्झ एक्सप्रेस' मध्ये पाऊल ठेवले. भारत मंडपमच्या हॉल क्रमांक ६ मध्ये साकारलेला हा बाल मंडप केवळ एक प्रदर्शन नसून, मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख देणारा एक जिवंत अनुभव ठरत आहे.

रेल्वेच्या थीमध्ये दडलेले कथांचे जग
नॅशनल बुक ट्रस्ट (NBT-इंडिया) तर्फे आयोजित हा मंडप एका रेल्वे प्रवासाच्या संकल्पनेवर आधारित आहे. जांभळा बाह्य भाग, अॅनिमेटेड खिडक्या आणि त्यावर चितारलेले तिकीट तपासणीस, चहावाला, संगीतकार आणि पुस्तकात हरवलेले मूल ही चित्रे दुरूनच मुलांचे लक्ष वेधून घेतात. वाफेसारखे बुडबुडे सोडणारे इंजिन प्रवेशद्वार आणि 'विद्या' व 'ज्ञान' यांसारखे मस्कॉट्स मुलांचे स्वागत करत आहेत.
प्रवासातील विविध 'कोचेस' (डबे) आणि उपक्रम
या एक्सप्रेसमध्ये प्रत्येक डबा (कोच) एका विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात आला आहे. येथील वाचन कोपऱ्याची भिंत अंतराळ थीमध्ये असून त्यावर "रीड बियॉन्ड द स्टार्स" हा संदेश दिला आहे. रॉकेटच्या आकाराच्या कपाटांतून मुले नवीन जगाच्या सफरीवर जात आहेत. येथे ऐतिहासिक स्टीम इंजिनपासून ते आधुनिक 'वंदे भारत'पर्यंतचे मॉडेल्स ठेवण्यात आले आहेत. "चलती का नाम रेल गाडी" या घोषवाक्याखाली मुले भारतीय रेल्वेची उत्क्रांती समजून घेत आहेत.
रीडर्स क्लब मूव्हमेंट
हा विभाग मुलांमध्ये वाचन-लेखनाची गोडी निर्माण करतो. देशभरातील मुलांनी लिहिलेल्या कविता आणि लेखांचे दर्शन येथे घडते.
किताब घर आणि इमोजी मी
मुले येथे अपूर्ण कथा पूर्ण करत आहेत, स्वतःच्या कविता रचत आहेत आणि पुस्तकांची मुखपृष्ठे डिझाइन करत आहेत. 'इमोजी मी' विभागात कलेच्या माध्यमातून मुले आपल्या भावना व्यक्त करायला शिकत आहेत.
क्लिक-मी जंक्शन व कलर मी
पाण्याखालील थीम असलेला फोटो कॉर्नर कुटुंबांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे, तर 'कलर मी' मधील मोठ्या कॅनव्हासवर मुले आपल्या मनातले रंग मुक्तपणे उधळत आहेत.
जागतिक कथांचा मेळ
किड्झ एक्सप्रेसमध्ये केवळ भारतीयच नव्हे, तर जागतिक संस्कृतीचाही अनुभव मिळत आहे. स्पेन, रशिया, फिनलंड आणि इस्रायल येथील आंतरराष्ट्रीय कथाकारांनी मुलांसोबत संवाद साधून या प्रवासाला जागतिक परिमाण दिले आहे. संगीत, कठपुतळी प्रयोग (Puppet Show) आणि नाटकांच्या माध्यमातून शाश्वत विकास उद्दिष्टांची (SDG) माहिती गमतीशीर पद्धतीने दिली जात आहे.
कला, विज्ञान आणि गणिताची जुगलबंदी
येथे केवळ कथाच नाहीत, तर सर्जनशील कार्यशाळांची रेलचेल आहे. मधुबनी, वारली कला, ओरिगामी, क्ले आर्ट आणि कार्टून डिझाइनिंगमध्ये मुलांचे छोटे हात उत्साहाने गुंतलेले दिसत आहेत. दुसरीकडे, 'गणित जादू', 'वैदिक गणित' आणि 'विज्ञान जादू' या उपक्रमांनी मुलांच्या मनातील या विषयांची भीती दूर करून कुतूहल जागृत केले आहे.
पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी खास सत्रे
संध्याकाळच्या वेळी हा मंडप शिक्षक आणि पालकांसाठी मार्गदर्शक केंद्र बनतो. खेळण्यांवर आधारित अध्यापनशास्त्र, वर्गातील मानसिक आरोग्य आणि सर्जनशील शिक्षण साधने यावर येथे तज्ज्ञांद्वारे कार्यशाळा घेतल्या जात आहेत.
दिग्गज लेखकांची उपस्थिती
या प्रवासाचे नेतृत्व अनिता सिन्हा, राजीव तांबे, जानकी सबेश, रामेंद्र कुमार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयरिस अर्गमन, इरिना क्रेवा यांसारख्या नामवंत लेखकांनी केले आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे मुलांचा हा अनुभव अधिकच समृद्ध झाला आहे.












Click it and Unblock the Notifications