'संभल जामा मशीद संकुलात बेकायदा बांधकाम, मुळ ढाचाच बदलला'; ASI कोर्टात काय म्हणाले?
Sambhal Jama Masjid dispute : उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीत पुरातत्व सर्वेक्षणाच्या निषेधार्थ झालेल्या हिंसक घटनेनंतर एएसआयने न्यायालयात मोठी गोष्ट सांगितली आहे.
न्यायालयात अहवाल सादर करताना, एएसआयने न्यायालयाला सांगितले की मशीद संकुलात प्राचीन इमारती आणि पुरातत्व अवशेषांचे संरक्षण कायदा 1958 च्या तरतुदींचे पूर्णपणे उल्लंघन करण्यात आलेले आहे. संभलच्या जामा मशीद संकुलात बेकायदा बांधकाम करून धार्मिक स्थळाचे मूळ स्वरूपच बदलले असल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

नेमका काय आहे वाद?
संभलच्या जामा मशीद प्रकरणावर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. मशिदीचा पाहणी अहवाल उघडला जाणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले. सुप्रीम कोर्टाने ट्रायल कोर्टाला 8 जानेवारीपर्यंत या प्रकरणी कोणतीही कारवाई करू नये असे सांगितले. शांतता आवश्यक आहे.
संभलच्या शाही जामा मशिदीच्या वतीने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सरन्यायाधीशांच्या खंडपीठात सुनावणी झाली.
यापूर्वी संभलच्या चंदौसी न्यायालयात सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला नव्हता. वकिल आयुक्त रमेश सिंह राघव म्हणाले- 24 नोव्हेंबरला सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार झाला होता, त्यामुळे अहवाल तयार होऊ शकला नाही. सर्वेक्षण अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाने 10 दिवसांची मुदत दिली आहे.
हिंसाचारात 4 तरुणांचा झाला होता मृत्यू?
रविवार, 24 नोव्हेंबर रोजी संभलमधील एका मशिदीत सर्वेक्षणादरम्यान उसळलेल्या हिंसाचारात चार तरुणांचा मृत्यू झाला होता. संभलच्या चंदौसी न्यायालयाने 19 नोव्हेंबर रोजी वकिलांची नियुक्ती केली होती आणि हिंदू बाजूच्या याचिकेवर सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. जामा मशीद हे हरिहर मंदिर असल्याचा हिंदू पक्षाचा दावा आहे.












Click it and Unblock the Notifications