Holi 2025 Rangoli Design: होळीसाठी ही खास रांगोळी काढा; डिझाईन आणि रांगोळीचे महत्व परंपरा काय? वाचा
Holi 2025 Rangoli Design : होळीचा सण या दिवशी गोडधोड पदार्थांसह पुरणपोळीला महत्व आहे. जसे पुरणपोळी आणि रंग खेळायला महत्व आहे तसेच होळी पेटवणे आणि चांगल्या गोष्टींचा अंगिकार करुन वाईट गोष्टी सोडून देणे ही आपली चांगली परंपरा. होळी हा मुख्यतः रंगांचा सण आहे.
हिंदू धर्मात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. होळी दोन दिवस साजरी केली जाते. ज्यामध्ये पहिल्या दिवशी होलिका दहन होते, ज्याला छोटी होळी असेही म्हणतात. दुसऱ्या दिवशी रंगांचा सण असतो ज्यामध्ये लोक एकत्र येतात आणि रंगांनी खेळतात आणि उत्सव साजरा करतात. रंगाचा टिळा तसेच पाण्याचे फुगे आणि पिचकारी वापरून होळी खेळण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे.

सण कोणताही असो रांगोळीला फार महत्व असते. रांगोळी काढणे हे भारतात जवळपास सर्वच राज्यात प्रचलित आहे. देवासमोर, घरासमोर रांगोळी काढणे हे उत्सवाचे, पवित्रतेचे प्रतिक आणि लोककलाही...होळीच्या सणाला रांगोळी कशी काढावी, रांगोळीचे प्रकार आणि महत्व यासंदर्भात आपण आज माहिती जाणून घेऊ.

रांगोळीचे महत्व आणि प्राचीन परंपरा
विकिपीडियानुसार, रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते पण त्यामागील निहित भावनेत आणि संस्कृतीमध्ये बरीचशी समानता आहे.

रांगोळी कुठे कुठे आणि कोणत्या सणाला काढतात
अंगणामध्ये रांगोळी रोज काढली जाते. जेवणाच्या ताटाभोवतीही काढतात. दिवाळी किंवा तिहार, ओणम, पोंगल आणि भारतीय उपखंडातील हिंदू सणांच्या वेळी घरासमोर रांगोळी हमखास काढतात. रांगोळ्यांच्या डिझाईन्स त्यांच्यातील कला आणि परंपरा दोन्ही जिवंत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठविल्या जातात.

रांगोळीचा हेतू काय
रांगोळीचा हेतू म्हणजे शक्ती, उदारता जाणवणे आणि नशीब मिळविणे हे आहे. परंपरा, लोकसाहित्य आणि प्रत्येक क्षेत्रासाठी खास असलेल्या पद्धती प्रतिबिंबित केल्यामुळे डिझाईनचे वर्णनदेखील भिन्न असू शकते. हे पारंपरिकपणे मुली किंवा महिलांनी केले आहे. साधारणता, सण, शुभ उत्सव, विवाह उत्सव आणि इतर समान टप्पे आणि मेळावे यासारख्या प्रसंगांमध्ये रांगोळ्या काढतात.

किती प्रकारची रांगोळी असते
रांगोळीचे आकृतीप्रधान आणि वल्लरीप्रधान असे दोन भेद मानले जातात. आकृतीप्रधान प्रकारात रेषा, वर्तुळ यांचा समावेश असतो तर वल्लरीप्रधान मध्ये वेळी, पाने, फुले यांचे आकार असतात. ठिपक्यांची रांगोळी हा आणखी एक प्रकार. प्रथम भूमीवर मोजून काही ठिपके देतात व ते उभ्या आडव्या रेषांनी जोडून त्यातून मोर, कासव, कमळ, वेल इ. आकृती निर्माण करतात. सध्याच्या काळात अनेक धार्मिक, सामाजिक व पर्यावरण विषयकही रांगोळ्या काढल्या
जातात. मुक्त हस्त चित्रात्मक रांगोळी असा कलाप्रकारही विकसित झालेला दिसून येतो.

राज्यानुसार रांगोळीची नावे
- महाराष्ट्र - रांगोळी
- कर्नाटक - रंगोली
- गुजरात - रंगोळी
- तमिळनाडू - कोलम
- राजस्थान - मांडना
- मध्य प्रदेश - चौकपूरना
- उत्तर प्रदेश - सोनारख्खा
- बंगाल - अलिपना
- केरळ - पुवीडल, कलम
- आंध्र प्रदेश - मुग्गुळु
- बिहार - अरीपण
- सौराष्ट्र - सध्या
- माळवा - चौकपूरणा
- ओडिशा - झुंटी













Click it and Unblock the Notifications