शेतकऱ्याचा नादच खुळा! 'लकी' कार स्क्रॅप करण्याऐवजी तिला पुरलं; अंत्यविधी काढून गावाला जेवणही दिलं
एखादी वस्तू लकी ठरली की लोक तिला खूप जपून ठेवतात, हे आपल्या सर्वांना माहिती असते. विशेषत: कुत्रा, मांजर, बैल, घोडा यासारखे पाळीव प्राणी अनेकांना लकी ठरतात अन् त्या प्राण्यांच्या शेवटच्या काळात त्यांची काळजी देखील घेतात.
यात पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला तर मालक त्या प्राण्याचा रितसर अंत्यविधी करतात. कृतज्ञता म्हणून असे अनेक घटना आपल्यासमोर आलेल्या आहेत. परंतु, गुजरातमधील एका कारमालकाचा नादच खुळा म्हणावा लागेल. लकी ठरलेली कारला भंगारात न टाकता त्या मालकाने थेट तिचा अंत्यविधी केला अन् गावाला जेवणही दिले. या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

नेमकं काय घडलं?
गुजरातमधील एका कुटुंबाने आपली 'लकी' कार स्क्रॅप करण्याऐवजी पुरून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रीतसर अंत्ययात्रा काढण्यात आली. गाडी फुलांनी सजवली होती. डीजे आणि वाद्य वाजवत गाडीला एका मोठ्या खड्ड्यात पुरण्यात आले.

10 फूट खोल खड्डा खोदला
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील पदरसिंगा गावातील आहे. संजय पोर्ला या शेतकऱ्याने 7 नोव्हेंबर रोजी या अनोख्या शैलीत अखेरचा कारला निरोप दिला. 10 फुटांपेक्षा जास्त खोल खड्डा केला. यासाठी चार लाखांहून अधिक खर्च झाला.
संजय पोलारा यांनी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी गेल्या दहा वर्षांपासून ही कार चालवत आहे. 2014 मध्ये ती मी सेकंड हँड विकत घेतली. कार खरेदी केल्यानंतर त्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस सुधारू लागली. शेतीसोबतच त्यांचा गावात व्यवसायही वाढला.

दीड हजार लोकांना निमंत्रण
समाधीपूर्वी बुधवारी रात्री गावाला जेवणाही देण्यात आले. संजय पोलारा यांनी संपूर्ण गावातील लोकांना आमंत्रित केले. या मेजवानीला पाहुणे आणि ग्रामस्थांसह सुमारे दीड ते दोन हजार लोकांनी हजेरी लावली होती.
जिथे कार पुरली, तिथे झाड लावणार
आपल्या भाग्यवान कारच्या स्मृती कायमस्वरूपी जिवंत ठेवण्यासाठी, ज्या ठिकाणी कार पुरली आहे त्या ठिकाणी एक झाड लावण्याचा निर्णयही घेतला आहे, असे संजय पोलारा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.












Click it and Unblock the Notifications