अहमदाबाद विमान अपघात : तांत्रिक बिघाड की 'घातपात' ; ब्लॅक बॉक्समधील संभाषणाने खळबळ
Ahmedabad Flight Crash : जून २०२५ मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला होता. २६० जणांचा बळी घेणाऱ्या या दुर्घटनेमागे सुरुवातीला तांत्रिक कारण असल्याचे बोलले जात होते. मात्र, ब्लॅक बॉक्सच्या रेकॉर्डिंगमधून समोर आलेल्या एका धक्कादायक संभाषणामुळे आता या तपासाला पूर्णपणे नवे वळण मिळाले आहे. हा अपघात अपघाती नसून "जाणीवपूर्वक केलेली मानवी कृती" असावा, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

ब्लॅक बॉक्समधील ते 'संशयास्पद' संभाषण
तपासकर्त्यांच्या हाती लागलेल्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरनुसार, विमानाचे इंजिन बंद पडण्यापूर्वी दोन्ही वैमानिकांमध्ये एक गंभीर संवाद झाला होता.
- सह-वैमानिक: "तुम्ही इंधन का कापले (Cut off)?"
- मुख्य वैमानिक: "मी नाही केले."
या संवादानंतर काही सेकंदातच इंजिनची वीज गेली आणि विमान कोसळले. या रेकॉर्डिंगमुळे तपासकर्त्यांचा संशय बळावला आहे की, कमांडर कॅप्टन सुमित सभरवाल किंवा फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर या दोघांपैकी कोणीतरी इंधन नियंत्रण स्विच मॅन्युअली 'कटऑफ' स्थितीवर नेला होता.
इटालियन वृत्तपत्राचा दावा अन् DGCA ची भूमिका
इटलीचे प्रसिद्ध दैनिक 'कोरीएर डेला सेरा' ने दिलेल्या वृत्तानुसार, तपास यंत्रणा आता 'इंधन बंद करण्याच्या' कृतीवर लक्ष केंद्रित करत आहेत. मात्र, भारताच्या DGCA ने स्पष्ट केले आहे की, अंतिम अहवाल येण्यापूर्वी कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे घाईचे ठरेल. अमेरिकन तज्ञही या तपासात भारताला मदत करत आहेत.
वैमानिकाचे मानसिक आरोग्य वादाच्या भोवऱ्यात
अहवालानुसार, कॅप्टन सुमित सभरवाल यांना अपघातानंतर काही दिवसांनी नैराश्याचे (Depression) निदान झाल्याचे समोर आले होते. मात्र, त्यांच्या वडिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या मुलाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या (घटस्फोट किंवा मानसिक स्थिती) अफवा चुकीच्या असून पुन्हा निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
बोईंग 787 विमानावरच प्रश्नचिन्ह?
एकीकडे मानवी चुकीचा दावा केला जात असतानाच, २ फेब्रुवारी २०२६ रोजी बेंगळुरूमध्ये घडलेल्या एका घटनेने तपासाची दिशा पुन्हा बदलू शकते. लंडन-बेंगळुरू विमान प्रवासादरम्यान इंधन स्विच 'रन' स्थितीत लॉक न होता आपोआप 'कटऑफ' कडे जात असल्याचे एका वैमानिकाने निदर्शनास आणून दिले. यामुळे बोईंग 787 विमानांच्या इंधन स्विचमध्येच काही उपजत तांत्रिक दोष तर नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.












Click it and Unblock the Notifications