8th Pay Commision: केंद्र कर्मचाऱ्यांना धक्का, जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार नाहीत!
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोग नेमका कधीपासून लागू होणार अशी संभ्रमावस्था कर्मचाऱ्यांमध्ये आहे. अशातच केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काही रिपोर्टनुसार, 1 जानेवारी 2026 पासून पगारवाढीची अपेक्षा करत असलेल्या कर्मचाऱ्यांना आता मोठा धक्का आहे. कारण आठव्या केंद्रीय वेतन आयोगाला इतक्या लवकर अहवाल सादर करता येणार नाही.
सरकारने जानेवारी 2025 मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती. ही घोषणा अर्थसंकल्पाच्या अगदी आधी करण्यात आली होती, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना आशा होती की 2026 पासून नवीन वेतन पद्धती लागू होईल. परंतु आतापर्यंत आयोगाचे अध्यक्ष, दोन सदस्य आणि सचिव स्तरावरील अधिकारी यांचीही नियुक्ती झालेली नाही. याचा अर्थ आठव्या वेतन आयोगाच्या निर्मितीची प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. मिळालेल्या माहितीनुसार व काही माध्यमांच्या अहवालानुसार हे वृत्त समोर आले आहे.

संसदेतही यावर उपस्थित झाला प्रश्नचिन्ह
मार्च 2025 मध्ये लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आठवा वेतन आयोग स्थापन करण्यात आल्याचे मान्य केले. परंतु त्यांनी असेही म्हटले की आयोगाच्या संदर्भ अटी आणि अहवालाची कालमर्यादा अद्याप निश्चित झालेली नाही.
अहवाल येण्यासाठी किती वेळ लागू शकतो?
अर्थ मंत्रालयाचे खर्च सचिव मनोज गोयल यांनी एका माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, जर आयोग मार्च 2025 मध्ये स्थापन झाला तर त्याचा अहवाल मार्च 2026 पर्यंत येणे अपेक्षित आहे. तथापि, यासाठी एक वर्षापेक्षा कमी वेळ लागू शकतो." याचा अर्थ असा की सरकारने 2025-26 च्या अर्थसंकल्पात पगारवाढीसाठी कोणताही निधी ठेवलेला नाही.
अहवालाला एवढा वेळ का लागतो?
वेतन आयोगाला सर्व मंत्रालये, कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारक गटांचे मत घ्यावे लागेल. यानंतरच अहवाल तयार केला जातो. गेल्या वेळी, 7 व्या वेतन आयोगाचा अहवाल तयार करण्यासाठी सुमारे 18 महिने लागले होते. त्यामुळे या समितीची स्थापना झाल्यानंतर निश्चितच वेळ लागणार आहे.
सातव्या वेतन आयोगाची स्थिती काय?
7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 2016 पासून लागू आहेत आणि त्यांचा कार्यकाळ 2026 पर्यंत आहे. परंपरेनुसार, दर दहा वर्षांनी एक नवीन आयोग स्थापन केला जातो. परंतु अहवाल देण्याच्या आणि अंमलबजावणीच्या प्रक्रियेत विलंब होतो.
2026 पासून नवीन पगार मिळेल का?
सरकारच्या वतीने, जरी आठव्या वेतन आयोगाचा अहवाल मार्च 2026 पर्यंत आला. परंतु, त्याची अंमलबजावणी त्वरीत होणे कठीण असते. त्यासाठी आणखी काही महिने देखील लागू शकतात. अशा परिस्थितीत, जानेवारी 2026 पासून नवीन पगार लागू होणे तसे कठीणच आहे, असेही सांगितले जात आहे.












Click it and Unblock the Notifications