शरद पवारांचे वर्गमित्र सायरस पूनावाला यांची जगातली सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी, काय आहे इतिहास?
world vaccine day 2025 : राष्ट्रीय लसीकरण दिवस दरवर्षी 16 मार्च रोजी साजरा केला जातो. देशात 16 मार्च 1995 रोजी तोंडाद्वारे पोलिओ लसीचा डोस सुरू करण्यात आला. या दिवसाने संपूर्ण देशात लसींच्या महत्त्वाविषयी जनजागृती केली. म्हणून, हा दिवस भारत सरकारच्या पल्स पोलिओ मोहिमेसाठी साजरा केला जातो.
देशातून पोलिओचं उच्चाटन करण्यासाठी सरकारने हा पुढाकार होता. या कार्यक्रमानुसार, 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओचे दोन थेंब दिले जातात. आता 16 मार्च रोजीपण राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर जगातली सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया नेमकी काय आहे आणि त्याची स्थापना करणारे सायरस पूनावाला यांची कहाणी काय, याविषयी जाणून घेऊया..!

शरद पवारांचे वर्गमित्र
शरद पवारांचे पुण्यातला बीएमसीसी कॉलेजचे वर्गमित्र असलेल्या सायरस पुनावाला यांनी पुण्यातील हडपसर या भागात 1966 साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. सायरस पूनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये रस होता. घोड्यांच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लसी तयार करण्यासाठी केला जातो. त्यातूनच सायरस पूनावाला हे लस या निर्मितीच्या व्यवसायात उतरले आणि तिथूनच सीरम इन्स्टिट्यूटचा प्रवास सुरू झाला.
लसीकरणाचा राजा म्हणून पूनावाला यांची ओळख
सायरस पूनावाला, ज्यांना लसीकरणाचा राजा म्हणूनही ओळखले जाते, ते अशा कुटुंबातील आहेत ज्यांचे भारतातील घोड्यांच्या शर्यतीशी दशकांपासून जुने संबंध आहेत. पूनावालाचा जन्म ११ मे १९४१ रोजी झाला आणि वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी आपल्या कुटुंबाच्या पावलावर पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेतला.
सायरस पूनावाला यांचे शिक्षण बिशप्स स्कूल, पूना म्हणजेच आत्ताच पुणे, येथे झालं आणि त्यांनी १९६६ मध्ये बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स मधून पदवी प्राप्त केली आणि त्यांनी पहिल्यांदा कारवर प्रयोग केले. त्यांनी त्यांच्या शाळेतील मित्रासोबत मिळून D-टाइप जग्वारवर आधारित $१२० ची प्रोटोटाइप स्पोर्ट्स कार बनवली. परंतु व्यावसायिक आधारावर स्पोर्ट्स कार तयार करण्यासाठी त्यांच्या दोन मित्रांपेक्षा जास्त पैसे लागत असल्याने त्यांनी ही कल्पना सोडून दिली.
सायरस पूनावाला यांना हे लक्षात आले की जनतेसाठी उत्पादन बनवणे हा एक हुशारीचा प्रयत्न असेल आणि त्यांनी १९६६ मध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ची स्थापना केली. त्यानंतर त्यांच्या कंपनीने दोन वर्षांत पहिले उपचारात्मक अँटी-टिटॅनस सीरम लाँच केले आणि अँटी-टिटॅनस लस तयार करण्यास सुरुवात केली.१९७४ पर्यंत, एसआयआयने डीटीपी लस देखील सादर केली, जी मुलांना डिप्थीरिया, टिटॅनस आणि पेर्ट्युसिसपासून संरक्षण देते. १९८१ मध्ये त्यांनी सर्पदंशासाठी अँटी-स्नेक-वेनम सीरम देखील तयार केले.१९८९ मध्ये, संस्थेने गोवर लसीचे उत्पादन सुरू केले आणि एका वर्षाच्या आत, कंपनी देशातील सर्वात मोठी लस उत्पादक बनली.
त्यानंतर, १९९४ मध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतातून लसी निर्यात करण्यासाठी मान्यता दिली आणि संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सींना उच्च दर्जाच्या लसींचा पुरवठा करण्यास सुरुवात केली.१९९८ पर्यंत, पूनावालाची कंपनी १०० हून अधिक देशांमध्ये लसींची निर्यात करत होती आणि २००० पर्यंत, जगातील प्रत्येक दोन मुलांपैकी एका मुलाला सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या लसीने लसीकरण करण्यात आले.२००५ मध्ये त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री आणि त्यानंतर २०२२ मध्ये व्यापार आणि उद्योग क्षेत्रात कोविड-१९ दरम्यान लसींच्या निर्मितीत योगदान दिल्याबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उत्पादित आणि विकल्या जाणाऱ्या डोसच्या संख्येनुसार, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आज जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी म्हणून उदयास आली आहे. ही संस्था दरवर्षी १.५ अब्जाहून अधिक डोस तयार करते, ज्यामध्ये पोलिओ लस, घटसर्प, धनुर्वात, पेर्ट्यूसिस, एचआयबी, बीसीजी, आर-हिपॅटायटीस बी, गोवर, गालगुंड, रुबेला तसेच न्यूमोकोकल लसींचा समावेश आहे. एसआयआयकडे अनेक कोविड-१९ लसी भागीदारी आहेत आणि ते कोविशिल्डची निर्मिती करतात - ही लस अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केली आहे.असा अंदाज आहे की जगभरातील सुमारे ६५% मुलांना सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेली किमान एक लस दिली जाते.
भारतातील श्रीमंतांच्या यादीत शीर्षस्थानी
फोर्ब्सच्या मते, सायरस पूनावाला २०२२ मध्ये भारतातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत होते आणि २०२३ मध्ये जगातील अब्जाधीशांच्या यादीत ६८ व्या क्रमांकावर होते.त्यांची एकूण संपत्ती २,२५,००० कोटी रुपये आहे.सायरस पूनावाला यांचे लग्न दिवंगत विल्लू पूनावाला यांच्याशी झाले होते आणि त्यांना एक मुलगा अदार आहे, जो सध्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक आहे आणि नवीन औषधे आणि बाजारपेठांमध्ये सीरमचे नेतृत्व करत आहे.
सीरम इन्स्टिट्यूटकडून पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. आज जगभरात आजारांवरती ज्या वेगवेगळ्या लसींचा उपयोग केला जातो त्यापैकी 65 टक्के लस या सीरम इन्स्टिट्यूटमध्येच तयार होतात. कोरोनावरील लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटचा ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्रा झेनेका यांच्या सोबत करार झालाय.
कोविड काळात पुनावाला यांची उत्तम कामगिरी
कोरोना काळात कोरोनावरील लसीवर संशोधन करणाऱ्या ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना प्राथमिक यश मिळाल्यावर लगेच त्या फॉर्म्युलाचा उपयोग करून सीरम इन्स्टिट्यूटने कोरोनावरील कोव्हीशील्ड या लसीचे डोस बनवणं सुरु केलं होत . कोरोना लसीच्या चाचण्या पूर्ण होण्याआधीच सीरम इन्स्टिट्यूटने लस निर्मिती सुरू करुन आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करुन एक प्रकारे जुगार खेळला होता.
सद्या कोणाच्या हातात आहे सीरमची सूत्रं!
पुढे ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून तयार करण्यात आलेल्या लसीच्या चाचण्या यशस्वी होत गेल्या आणि सीरम इन्स्टिट्यूटकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या. सीरम इन्स्टिट्यूटचा कारभार आता मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आता अदर पुनावाला हे पाहत असतात. सीरम इन्स्टिट्यूटकडून तयार करण्यात येत असलेल्या एकूण लसीपैकी नव्वद टक्के लसी या सुरुवातीला भारतीय लोकांना दिल्या जातील असं अदर पुनावाला यांनी जाहीर केलं आहे. आणि ही एक लस सरकारला अडीचशे रुपयांना खरेदी करावी लागणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. पुनावाला आणि त्यांची प्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूट आरोग्य, स्वच्छता आणि बाल संगोपन यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी समाजकार्यासाठी खर्च करत असते.












Click it and Unblock the Notifications