World Tuberculosis Day : टीबी का होतो, आजार वाढल्याने मृत्यू होतो का? जाणून घ्या कारणे, लक्षणे उपाय
World Tuberculosis Day : टीबी म्हणजे ट्युबरकोसिस या आजाराला मराठीत क्षयरोग म्हणतात. क्षयरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे जो आज संपूर्ण जगाला प्रभावित करत आहे. त्यामुळेच क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे क्षयरोगाच्या संसर्गाबाबत जनजागृती करणे आणि या जागतिक महामारीचा अंत करण्याच्या प्रयत्नांना चालना देणे हा आहे. या आजाराबाबत अनेक समज आहेत तितकेच गैरसमजही आहेत.
टिबी का होतो...? टीबी बरा होऊ शकतो का...आणि त्यासाठी काय उपाय आहेत हे प्रश्न सामान्य आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोतच परंतु, त्याआधी टीबीच्या जीवाणूचा शोध कसा लागला हेही पाहूया.

टीबीच्या जीवाणूचा शोध कसा लागला?
1882 मध्ये डॉ. रॉबर्ट कोच यांनी टीबीच्या जीवाणूचा शोध लावला. डॉ. कोच यांच्या शोधामुळे या आजाराच्या उपचारासाठी नवे मार्ग खुले झाले. जागतिक क्षयरोग दिन हा जगभरातील क्षयरोगाच्या प्रभावाबद्दल लोकांना शिक्षित करण्याचा दिवस आहे. आज जगभरात क्षयरोगाची लक्षणे आणि उपाय याविषयी माहिती देण्यासाठी शिबिरे आयोजित केली जातात. आज जगातील जवळपास सर्वच देशात टीबीचे उपचार उपलब्ध आहेत. पण त्या संसर्गजन्य रोगामुळे अजूनही विकसनशील देशांमध्ये दरवर्षी सुमारे 1.5 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो.
क्षयरोगामुळे जगात रोज 4 हजार जणांचा मृत्यू
टीबी हा जगातील सर्वात प्राणघातक संसर्गजन्य रोग आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, टीबी हा जगातील सर्वात घातक संसर्गजन्य रोगांपैकी एक आहे, ज्यामुळे सर्वाधिक मृत्यू होतात. दररोज सुमारे 4 हजार लोक टीबीमुळे आपला जीव गमावतात. जवळपास दररोज 28 हजार लोक या आजाराला बळी पडतात आणि उपचार घेतात. 2000 पासून क्षयरोगाचा सामना करण्याच्या जागतिक प्रयत्नांमुळे जगभरात 63 दशलक्ष जीव वाचले आहेत.
भारतात क्षयरोग किती गंभीर!
एका अहवालानुसार, टीबी संसर्गामुळे भारतात सर्वाधिक मृत्यू होतात. 2019 मध्ये भारतात टीबीमुळे 4.45 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. जे जागतिक मृत्यू दराच्या 31 टक्के आहे. 2020 मध्ये, असा अंदाज होता की, जागतिक स्तरावर एक कोटीहून अधिक लोकांना टीबीची लागण झाली होती, त्यापैकी 26 टक्के किंवा 26 लाख लोक भारतात असल्याचा अंदाज होता.
क्षयरोग दिन 2025 वर्षाची थीम काय?
जगभरातील देशांनी टीबी सारख्या प्राणघातक आजाराला दूर करण्यासाठी मोठी आणि जलद पावले उचलावी म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवले गेले आहेत. हा रोग जितका जास्त पसरतो तितका लोकांचा जीव गमावण्याचा धोका जास्त असतो. क्षयरोग दिन 2025 ची थीम सोप्या शब्दात सांगायची असेल तर होय..आपण क्षयरोग संपवू शकतो ही आहे.
टीबीची लक्षणे आणि उपाय
क्षयरोगाची लक्षणे
- 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला
- खोकल्यामध्ये रक्त/थुंक
- ताप, भूक न लागणे
- छातीत दुखणे, थकवा जाणवणे इत्यादी.
टीबी टाळण्यासाठी उपाय
- मुलांना बीसीजी लस द्यावी.
- टीबीच्या रुग्णांकडे मास्क आणि चेहरा झाकून जावे.
- टीबीच्या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
- टीबीसाठी डॉक्टरांच्या संपर्कात राहावे.
टीबीची कारणे
टीबी, ज्याला क्षयरोग देखील म्हणतात, हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे आणि सामान्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो, परंतु शरीराच्या इतर भागांवर देखील परिणाम करू शकतो. टीबी हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जिवाणूमुळे होतो, जो हवेद्वारे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो.












Click it and Unblock the Notifications