काही पुरुषांची छाती महिलांसारखी का होते?, 'या' गंभीर आजाराची लक्षणे वेळीच ओळखा!
Breast Development in Boys Symptoms Know details in Marathi : किशोरावस्था ही अशी अवस्था असते, ज्यामुळे मुले-मुली एका वेगळ्या वळणात बदलत असतात. त्यांच्यात अनेक बदल होत जातात.
ज्यामध्ये प्रामुख्याने स्नायूंचा विकास, आवाज घोगरा होणे, मिशा आणि दाढी येणे ही लक्षणे प्रामुख्याने मुलांमध्ये दिसायला लागतात.
मात्र, काही वेळा मुलांमध्ये एक असा बदल दिसून येतो, ज्यामुळे त्यांना खूप लाज वाटते आणि मानसिक ताणतणावालाही त्याला सामोरं जावं लागतं. तो बदल म्हणजे काही मुलांच्या स्तनांच्या आकारात होणारी अचानक वाढ.
काही मुलांमध्ये छातीभोवती अचानक चरबी जमा होऊ लागते आणि मुलींप्रमाणे स्तनांचा आकार वाढू लागतो. ही स्थिती केवळ त्यांच्या स्वतःच्या प्रतिमेवर परिणाम करत नाही, तर त्यांचा आत्मविश्वासही खचवून टाकते. अनेकदा पालक किंवा मुले स्वतःच याकडे लठ्ठपणा समजून दुर्लक्ष करतात.
मात्र, ही 'गायनेकोमास्टिया' (Gynecomastia) नावाची एक वैद्यकीय स्थिती आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, लठ्ठपणा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य राहणार नाही.
कारण ते भविष्यात त्यांच्यासाठी डोकेदुखी देखील ठरू शकते, तर आत्मविश्वास गमावणारी ही स्थिती असणार आहे. चला तर याविषयी आज या लेखातून समजून घेऊ, त्यावर काय करता येईल, यावरही साधकबाधक चर्चा करूया.

गायनेकोमास्टियाची प्रमुख कारणे कोणती?
गायनेकोमास्टियामागे अनेक कारणे असू शकतात, ज्यात प्रामुख्याने हार्मोनल असंतुलन आणि जीवनशैलीचा समावेश होतो.
हार्मोनल असंतुलन
पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन (Testosterone) आणि इस्ट्रोजेन (Estrogen) हे दोन मुख्य हार्मोन्स आहेत. टेस्टोस्टेरॉन पुरुषी वैशिष्ट्ये निर्माण करतो, तर इस्ट्रोजेन स्त्री-वैशिष्ट्ये. जर पुरुषांमध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढले, तर स्तनाच्या ऊती (breast tissue) वाढू लागतात, ज्यामुळे स्तनांचा आकार वाढतो.
पौगंडावस्थेतील हार्मोनल चढउतार
किशोरावस्थेत हार्मोन्समध्ये नैसर्गिक चढउतार होत असतात. हे गायनेकोमास्टियाचे सर्वात सामान्य कारण आहे आणि बहुतेक प्रकरणे उपचारांशिवाय आपोआप बरी होतात.
लठ्ठपणा
शरीरात चरबी वाढल्याने छातीचा आकार स्तनांसारखा दिसू शकतो. वैद्यकीयदृष्ट्या याला 'स्यूडोगायनेकोमास्टिया'असेही म्हणतात, कारण यात स्तनाच्या ऊती नव्हे, तर फक्त चरबी वाढलेली असते.
औषधे किंवा स्टिरॉइड्स
काही विशिष्ट औषधे (उदा. अल्सर, हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा कर्करोगावरील) आणि शरीर सौष्ठवासाठी (bodybuilding) वापरले जाणारे ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स या स्थितीला चालना देऊ शकतात.
यकृत किंवा मूत्रपिंडाचे आजार
कधीकधी गंभीर यकृत किंवा मूत्रपिंडाच्या विकारांमुळे शरीरात हार्मोनल असंतुलन निर्माण होऊ शकते, ज्यामुळे गायनेकोमास्टिया होऊ शकतो.
स्तनाचा आकार वाढल्यास काय करावे?
जरी अनेकदा गायनेकोमास्टिया सामान्य असला तरी, काही विशिष्ट लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे.
वाढलेले स्तनाचे ऊतक बराच काळ टिकून राहिल्यास. स्तनामध्ये वेदना, गाठ किंवा द्रव गळती होत असल्यास. एका स्तनाचा आकार दुसऱ्या स्तनापेक्षा जास्त वाढलेला दिसल्यास. ही समस्या तुम्हाला भावनिक किंवा मानसिकदृष्ट्या खूप त्रास देत असते, त्यावर उपचार करण्याची गरज आहे.
अनेक प्रकरणांमध्ये, विशेषतः पौगंडावस्थेतील, कोणत्याही उपचारांची आवश्यकता नसते आणि स्थिती काही वर्षांत आपोआप सुधारते. जर हार्मोनल असंतुलन हे कारण असेल, तर डॉक्टर त्याचे निदान करू शकतात आणि योग्य औषधे लिहून देऊ शकतात.
काही गंभीर प्रकरणांमध्ये, जिथे वैद्यकीय उपचार प्रभावी ठरत नाहीत किंवा स्तनांचा आकार खूप मोठा असतो, तिथे शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केली जाते.
लठ्ठपणामुळे होणाऱ्या गायनेकोमास्टियामध्ये नियमित व्यायाम आणि वजन कमी करणे खूप मदत करू शकते. संतुलित आहार घेणेही महत्त्वाचे आहे.
लज्जा नव्हे, जागृत होण्याची गरज!
गायनेकोमास्टिया ही लज्जेची बाब नाही, तर एक सामान्य वैद्यकीय स्थिती आहे. वेळेवर या स्थितीला समजून घेणे आणि त्यावर उपचार करणे महत्त्वाचे आहे.
जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी या अवस्थेतून जात असाल, तर घाबरू नका. तज्ञांचा सल्ला घ्या आणि योग्य माहिती मिळवून याविषयी जागरूकता वाढवा. योग्य वेळी योग्य उपचाराने या समस्येवर मात करता येते.












Click it and Unblock the Notifications