धक्कादायक! दर 8 मिनिटांनी होतोय एका महिलेचा मृत्यू; 'या' कर्करोग रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ!
Cervical cancer symptoms : भारतीय महिलांमध्ये आरोग्यविषयक अनेक समस्या असल्याचे समोर आले आहे. महिलांच्या आरोग्याबाबत अनेक गंभीर आव्हाने आहेत, त्यापैकी 'गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग' हा अत्यंत चिंताजनक विषय बनत चालला आहे.
राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंधक आणि संशोधन संस्थेच्या आकडेवारीनुसार, भारतात दर ८ मिनिटांनी एका महिलेचा या आजारामुळे मृत्यू होतो. जानेवारी हा महिना 'गर्भाशयाच्या कर्करोग जागरूकता महिना' म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने या आजाराची कारणे, लक्षणे आणि बचावाचे उपाय जाणून घेणे काळाची गरज आहे.

काय आहे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग?
गर्भाशयाचा सर्वात खालचा भाग जो योनीमार्गाशी जोडलेला असतो, त्याला 'गर्भाशयाचे मुख' म्हणतात. जेव्हा या भागातील पेशींची असामान्य वाढ होते, तेव्हा त्याला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणतात. याचे मुख्य कारण ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) हा विषाणू आहे, जो प्रामुख्याने लैंगिक संपर्काद्वारे पसरतो.
ही लक्षणे ओळखणे अतिशय महत्त्वाचे!
या आजाराला 'मूक हत्यार' म्हटले जाते, कारण सुरुवातीच्या टप्प्यात याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाही. मात्र, आजार बळावल्यावर खालील बदल दिसू शकतात.
- मासिक पाळी व्यतिरिक्त किंवा रजोनिवृत्तीनंतर होणारा असामान्य रक्तस्त्राव.
- संभोग करताना किंवा नंतर होणाऱ्या वेदना आणि रक्तस्त्राव.
- योनीतून दुर्गंधीयुक्त किंवा रक्ताळलेला स्त्राव होणे.
- ओटीपोटात किंवा पाठीच्या खालच्या भागात सतत वेदना जाणवणे.
- विनाकारण वजन कमी होणे आणि सतत थकवा जाणवणे.
तपासणीसाठी महत्त्वाच्या चाचण्या
कर्करोग होण्यापूर्वीच पेशींमधील बदल ओळखण्यासाठी 'स्क्रीनिंग' अत्यंत प्रभावी ठरते. यासाठी दोन मुख्य चाचण्या केल्या जातात.
१. पॅप स्मीअर चाचणी (Pap Smear)
ही एक साधी आणि वेदनारहित प्रक्रिया आहे. यात गर्भाशयाच्या मुखातील पेशींचा नमुना घेऊन तपासणी केली जाते. ही चाचणी कर्करोगपूर्व स्थिती ओळखण्यास मदत करते.
२. एचपीव्ही (HPV) चाचणी
ही चाचणी थेट कर्करोगास कारणीभूत असलेल्या उच्च-जोखीम विषाणूचा शोध घेते.
तपासणी कधी करावी?
- २१ ते २९ वर्षे : दर ३ वर्षांनी पॅप स्मीअर चाचणी.
- ३० ते ६५ वर्षे : दर ५ वर्षांनी एचपीव्ही चाचणी किंवा दर ३ वर्षांनी पॅप स्मीअर चाचणी.
एचपीव्ही (HPV) लस : कर्करोगावर प्रभावी ढाल
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा अशा मोजक्या कर्करोगांपैकी एक आहे, जो लसीकरणाद्वारे टाळता येतो. ही लस शरीरात अँटीबॉडीज तयार करून विषाणूचा संसर्ग रोखते.
वयोगट : ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी ही लस सर्वाधिक प्रभावी आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याने ४५ वर्षांपर्यंतच्या महिला देखील ही लस घेऊ शकतात.
डोस : ९ ते १४ वर्षे वयोगटासाठी २ डोस, तर १५ वर्षांवरील महिलांसाठी ३ डोस आवश्यक असतात.












Click it and Unblock the Notifications