तुमच्या नखांचा रंग बदलतोय काय, मग या बीमारीचे आहे संकेत; वेळीच जाणून घ्या अन् सतर्क व्हा!
nail health signs : नखांच्या सौंदर्याकडे वारंवार लक्ष दिले जाते. विशेषत: महिलांमध्ये नखांच्या सौदर्याविषयी खास क्रेझ पाहायला मिळते. पण ती आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहेत याचा विचार करत नाही. नखे केवळ आकर्षक दिसण्यासाठी नसून, ती आपल्या शरीराचे एक महत्त्वाचे आरोग्य सूचक आहेत.
नखांचा रंग, पोत आणि आकारात होणारे सूक्ष्म बदल हे शरीरात दडलेल्या अनेक गंभीर आजारांचे संकेत देऊ शकतात. या संकेतांना वेळीच ओळखल्यास, अनेक मोठ्या आरोग्य समस्या टाळता येतात.

नखांचे रंग आणि त्याचे आरोग्य कनेक्शन
पांढरी नखे
जर तुमची नखे पूर्णपणे पांढरी दिसत असतील, तर ते यकृताच्या समस्या (उदा. कावीळ) किंवा शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अॅनिमियाचे लक्षण असू शकते.
पिवळी नखे
नखांचा पिवळा रंग अनेकदा बुरशीजन्य संसर्गामुळे किंवा थायरॉईडच्या समस्यांमुळे दिसून येतो. याव्यतिरिक्त, शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता असल्यासही नखे पिवळी दिसू शकतात.
निळी नखे
नखे निळी दिसणे हे एक गंभीर लक्षण आहे. याचा अर्थ शरीरात पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाहीये. हे फुफ्फुसांशी संबंधित किंवा इतर गंभीर आजारांचे संकेत असू शकतात. अशा वेळी, लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
काळे किंवा तपकिरी डाग
नखांवर दिसणारे काळे किंवा तपकिरी रंगाचे डाग हे त्वचेच्या कर्करोगाच्या (मेलेनोमा) सुरुवातीचे लक्षण असू शकतात. जर हे डाग अचानक वाढू लागले तर तात्काळ डॉक्टरांची तपासणी करून घ्या.
लाल नखे
नखांचा जास्त लालसरपणा शरीरात जळजळ किंवा संसर्गाचे लक्षण असू शकते. काहीवेळा हे हृदयाच्या समस्यांशी देखील संबंधित असू शकते.
पांढरे डाग
नखांवर दिसणारे पांढरे डाग सामान्यतः कॅल्शियम किंवा झिंकच्या कमतरतेमुळे होतात. हे सहसा फारसे गंभीर नसतात, पण जर ते जास्त प्रमाणात दिसले तर तपासणी करणे योग्य ठरेल.
नखांचा पोत आणि आकार सांगतो काय?
नखांच्या रंगाव्यतिरिक्त त्यांच्या पोत आणि आकारात होणारे बदलही महत्त्वाचे असतात.
चमच्यासारखी नखे
जर नखे चमच्याच्या आकारासारखी आतल्या बाजूला वळलेली असतील, तर ते शरीरातील गंभीर लोहाच्या कमतरतेचे लक्षण आहे.
जाड आणि वेडीवाकडी नखे
नखे जास्त जाड होणे किंवा वेडीवाकडी वाढणे हे बुरशीजन्य संसर्ग किंवा इतर काही गंभीर आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते.
डॉक्टर काय सांगतात?
तज्ज्ञ डॉक्टर सांगतात की, नखांमध्ये कोणताही असामान्य बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. नखांच्या रंग, आकार किंवा पोत यामध्ये कोणताही बदल दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर निदान आणि उपचार केल्यास अनेक गंभीर आजार टाळता येऊ शकतात. निरोगी नखे हे निरोगी शरीराचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. नखांमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक लहान बदलाकडे लक्ष दिल्यास आपण आपल्या आरोग्याचे संरक्षण करू शकतो.












Click it and Unblock the Notifications