खोकला हलक्यात घेऊ नका; केवळ सिगारेटच नाही, तर 'ही' गोष्ट ठरतेय फुफ्फुसाच्या कँन्सरचे कारण!
Lung Cancer Symptoms & Causes : "खोकलाच तर आहे, हवापालट झाला असेल म्हणून येत असेल..." असं म्हणून जर तुम्ही सतत येणाऱ्या खोकल्याकडे दुर्लक्ष करत असाल, तर सावधान! कारण हा सामान्य खोकला नसून जगभरात सर्वाधिक बळी घेणाऱ्या 'लंग्स कॅन्सर' म्हणजेच फुफ्फुसाच्या कर्करोगाची पहिली हाक असू शकते. धक्कादायक म्हणजे, आता केवळ धूम्रपान करणाऱ्यांनाच नाही, तर वाढत्या प्रदूषणामुळे धूम्रपान न करणाऱ्यांनाही या 'सायलेंट किलर'चा धोका निर्माण झाला आहे. वेळेत निदान न झाल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो.

लंग्स कॅन्सरचे दोन मुख्य प्रकार
पिंपरी (पुणे) येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे फुफ्फुस प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल केंद्रे यांच्या मते, फुफ्फुसाचा कर्करोग दोन प्रकारचा असतो.
- १. नॉन-स्मॉल सेल (NSCLC): ८५% रुग्णांमध्ये हा प्रकार आढळतो. हा हळूहळू पसरतो.
- २. स्मॉल सेल (SCLC): १५% रुग्णांमध्ये हा प्रकार दिसतो, मात्र हा अत्यंत वेगाने शरीरात पसरतो.
ओळखा ही धोक्याची लक्षणे (Early Symptoms)
सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे अगदी सौम्य असतात, त्यामुळे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र खालील लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- दीर्घकालीन खोकला: जो औषधोपचार करूनही बरा होत नाही.
- आवाजात बदल: अचानक आवाजात घोगरेपणा किंवा जडपणा येणे.
- श्वास घेण्यास त्रास: चालताना किंवा बसल्या जागी धाप लागणे.
- रक्तमिश्रित बलगम: खोकल्यावाटे बेडका किंवा रक्त येणे.
- छातीत दुखणे: श्वास घेताना छातीत जडपणा किंवा टोचल्यासारखे वाटणे.
- अचानक वजन घटणे: कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे आणि सतत थकवा जाणवणे.
धूम्रपान न करणाऱ्यांना धोका का?
आजच्या धावपळीच्या युगात वाढते वायू प्रदूषण, धुलीकण, 'पॅसिव्ह स्मोकिंग' (दुसऱ्याने सोडलेला धूर श्वासात जाणे) आणि घातक रेडॉन गॅस यामुळे नॉन-स्मोकर्समध्येही हा कर्करोग वाढत आहे.
या आजारापासून बचावासाठी काय करावे?
- वर्षातून एकदा LDCT (लो डोस सीटी स्कॅन) करून फुफ्फुसांची तपासणी करा.
- प्रदूषित भागात मास्कचा वापर करा.
- घरामध्ये वेंटिलेशन (हवा खेळती) ठेवा.
- सकस आहार आणि नियमित व्यायाम करा.
(डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य जागरूकतेसाठी आहे. कोणत्याही आरोग्यविषयक समस्येसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)












Click it and Unblock the Notifications