केवळ दारु-सिगारेटचे व्यसनच नव्हे, तर तुमच्या जीवनातील 'या' 5 सवयी ठरू शकतात कॅन्सरचे कारण!
Daily habits causing cancer : जेव्हा आपण कर्करोगाच्या धोक्याबद्दल बोलतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सिगारेट, तंबाखू किंवा मद्यपान यांसारखी मोठी व्यसनांची कारणे समोर येतात. हे धोके स्पष्ट तसेच सर्व परिचित असे जगजाहीर आहेतच. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हे संपूर्ण चित्र नाही. कर्करोगाचा धोका अनेकदा आपल्या दैनंदिन जीवनातील अशा लहान सवयींमधून निर्माण होतो, ज्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. यालाच तज्ज्ञ 'सूक्ष्म-प्रदर्शन' असे म्हणतात. दैनदिन जीवनातील कोणत्या सवयीमुळे तुमच्या शरीरात कर्करोगाचा धोका वाढतो, याविषयी या लेखातून जाणून घेऊया.

वायू प्रदूषण आणि सूक्ष्म कण (PM2.5)
आपण दररोज श्वासावाटे घेतो ते वायू प्रदूषण फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. वाहनांचा धूर, बांधकामाची धूळ आणि इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडणारे PM2.5 सारखे सूक्ष्म कण थेट फुफ्फुसांच्या खोलवर शिरतात.
धोका : अनेकदा धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही फुफ्फुसाचा कर्करोग होतो, याचे मुख्य कारण म्हणजे या कणांशी येणारा दीर्घकालीन संपर्क. एका दिवसाचा परिणाम छोटा वाटला तरी, वर्षानुवर्षे हे कण शरीरात साठल्याने गंभीर आजार उद्भवू शकतात.
अतिनील किरणांचा (UV Rays) सौम्य संपर्क
समुद्रकिनारी किंवा प्रखर उन्हात जाताना आपण त्वचेची काळजी घेतो, परंतु दैनंदिन प्रवासात आपण सूर्याकडे दुर्लक्ष करतो.
धोका : कामावर जाताना, दुचाकी चालवताना किंवा बाहेर व्यायाम करताना त्वचेवर पडणारा सूर्यप्रकाश सौम्य वाटतो, मात्र यातील अल्ट्राव्हायोलेट किरणोत्सर्ग त्वचेच्या पेशींमधील डीएनए (DNA) मध्ये बदल घडवून आणू शकतो. हे सततचे 'सौम्य नुकसान' कालांतराने त्वचेच्या कर्करोगाला निमंत्रण देऊ शकते.
प्रक्रिया केलेले अन्न आणि साखरेचा अतिवापर!
आपल्या आहारातील आधुनिक बदल हे कर्करोगाच्या वाढत्या धोक्याचे प्रमुख कारण आहेत.
धोका : प्रक्रिया केलेले मांस (Processed Meat), अति प्रमाणात मद्यपान, साखरेचे दीर्घकाळ सेवन आणि त्यातून येणारी लठ्ठपणा (Obesity) या गोष्टी एका रात्रीत परिणाम दाखवत नाहीत. परंतु, यामुळे शरीरात 'इन्सुलिन प्रतिरोध' आणि 'हार्मोनल बदल' होऊन अशी परिस्थिती निर्माण होते, जिथे असामान्य पेशींची वाढ वेगाने होऊ शकते.
अपुरी झोप आणि बिघडलेली जीवनशैली!
रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणे किंवा उशिरापर्यंत जागणे हे केवळ थकव्याचे कारण नाही, तर तो कर्करोगाचा एक छुपा धोका आहे.
धोका: अनियमित दिनचर्येमुळे शरीराची नैसर्गिक 'सर्कॅडियन लय' (Circadian Rhythm) बिघडते. यामुळे शरीरातील मेलाटोनिन हार्मोन आणि चयापचय प्रक्रियेवर परिणाम होतो, जे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाच्या जोखमीशी जोडले गेले आहेत.
जास्त वेळ बसून राहणे
आजच्या डिजिटल युगात एकाच जागी तासनतास बसून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. हालचालीचा अभाव शरीरातील दाह (Inflammation) वाढवण्यास कारणीभूत ठरतो, जे पुढे पेशींच्या विकृतीस कारणीभूत ठरू शकते.
प्रतिबंधात्मक उपाय : स्वतःला कसे सुरक्षित ठेवाल?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, ध्येय भीती पसरवणे नसून जागरूकता निर्माण करणे आहे. आपल्या शरीरात डीएनए दुरुस्तीची आणि रोगप्रतिकारक शक्तीची मजबूत यंत्रणा असते. तरीही, हे धोके कमी करण्यासाठी खालील बदल करणे आवश्यक आहे.
- सनस्क्रीनचा वापर : घराबाहेर पडताना नियमित सनस्क्रीन वापरा, जेणेकरून अतिनील किरणांपासून संरक्षण मिळेल.
- आहारात सुधारणा : प्रक्रिया केलेले मांस आणि अतिरिक्त साखर टाळा. जास्तीत जास्त नैसर्गिक अन्नाचा समावेश करा.
- पुरेशी झोप : दिवसातून किमान ७-८ तासांची शांत झोप घेण्याचा प्रयत्न करा आणि एक ठराविक दिनचर्या पाळा.
- हवा खेळती ठेवा : घरामध्ये आणि कामाच्या ठिकाणी योग्य वायुवीजन (Ventilation) असल्याची खात्री करा.
- सक्रीय राहा : व्यायामाची सवय लावा आणि तासनतास एका जागी बसणे टाळा.
थोडक्यात सांगायचे झाले तर, कर्करोग बहुतेकदा एका मोठ्या निर्णयाने नाही, तर वर्षानुवर्षे जपलेल्या लहान सवयींनी आकार घेतो. त्यामुळे आज घेतलेले छोटे पण सकारात्मक निर्णय भविष्यात मोठे संरक्षण देऊ शकतात.












Click it and Unblock the Notifications