इअरफोन्सचा अतिवापर बेतू शकतो तुमच्या श्रवणशक्तीवर! 'हे' गंभीर आजार टाळण्यासाठी वेळीच व्हा सावध
earphone side effects : आजच्या धावपळीच्या जीवनात तंत्रज्ञान आपली गरज बनले आहे. मग तो ऑफिसचा कॉल असो, प्रवासातील मनोरंजन असो किंवा जिममधील वर्कआउट, इअरफोन्स (Earphones) आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. मात्र, कानाला लावून तासनतास संगीत ऐकण्याची ही 'स्टाईल' तुम्हाला कायमचे बहिरे बनवू शकते, असा धोक्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा धडकी भरवणारा अहवाल
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, जगभरातील जवळपास एक अब्ज तरुणांना त्यांच्या असुरक्षित श्रवण सवयींमुळे श्रवणशक्ती गमावण्याचा धोका आहे. गाणी ऐकताना आवाजाची उच्च तीव्रता आणि इअरफोन्सचा दीर्घकाळ वापर हे यामागचे मुख्य कारण आहे.
नेमकी समस्या काय उद्भवते?
आपल्या कानाची रचना अतिशय नाजूक असते. मणिपाल हॉस्पिटल्सच्या एका अहवालानुसार, जेव्हा आपण इअरफोन्सद्वारे मोठा आवाज ऐकतो, तेव्हा खालील प्रक्रिया घडते:
कंपने: ध्वनी लहरी कानाच्या पडद्याला कंपित करतात.
कोक्लीयावर परिणाम: ही कंपने आतील कानातील 'कोक्लीया' (Cochlea) पर्यंत पोहोचतात, जिथे हजारो सूक्ष्म केसांच्या पेशी असतात.
कायमस्वरूपी नुकसान: मोठ्या आवाजाचा सततचा दबाव या केसांच्या पेशींची संवेदनशीलता नष्ट करतो. एकदा का या पेशींचे नुकसान झाले की, ते पुन्हा भरून काढता येत नाही, ज्यामुळे कायमचे बहिरेपण येऊ शकते.
जास्त वापरामुळे होणारे आजार आणि लक्षणे
केवळ श्रवणशक्ती कमी होणे एवढाच धोका नसून, इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात:
टिनिटस (Tinnitus): कानात सतत घणघण किंवा शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणे.
हायपरॅक्युसिस (Hyperacusis): सामान्य आवाजही कानाला असह्य होणे किंवा टोचणे.
संसर्ग (Infections): इअरफोन्स कुठेही ठेवल्याने त्यावर बॅक्टेरिया जमा होतात. ते इतरांसोबत शेअर केल्याने कानाचे गंभीर संसर्ग होतात.
इतर समस्या: चक्कर येणे, कानात तीव्र वेदना होणे आणि कानात मळ (Earwax) जास्त प्रमाणात जमा होणे.
प्रतिबंधात्मक उपाय: कानांची काळजी कशी घ्यावी?
तुमची श्रवणशक्ती जपण्यासाठी तज्ज्ञांनी खालील सोपे बदल सुचवले आहेत:
६०/६० नियम पाळा : इअरफोन्सचा आवाज नेहमी ६० टक्क्यांपेक्षा कमी ठेवा आणि दिवसातून ६० मिनिटांपेक्षा जास्त वापर टाळा.
नॉईज कॅन्सेलेशनचा वापर : शक्य असल्यास 'नॉईज कॅन्सेलेशन' (Noise Cancellation) हेडफोन्स निवडा. यामुळे बाहेरील गोंगाट कमी ऐकू येतो आणि तुम्हाला आवाज वाढवावा लागत नाही.
स्वच्छता महत्त्वाची : आपले इअरफोन्स नियमितपणे सॅनिटाईज करा आणि ते कोणाशीही शेअर करू नका.
प्रवासात सावधगिरी : बस किंवा रेल्वेमधील गोंगाटात गाणी ऐकताना आपण नकळत आवाज वाढवतो, जे कानासाठी अत्यंत घातक आहे. अशा वेळी इअरफोन्स टाळणेच हिताचे आहे.












Click it and Unblock the Notifications