धोक्याची घंटा! गरोदरपणात पाय दुखणे, सूज येणे 'साधी गोष्ट' नाही! 'या' गंभीर आजाराकडे दुर्लक्ष करू नका
DVT in Pregnancy Leg Swelling and Pain Causes : मातृत्व हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी अनुभव असतो. मात्र, या काळात महिलांना अनेक शारीरिक बदलांना आणि आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यातील एक गंभीर पण अनेकदा दुर्लक्षित होणारी समस्या म्हणजे डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT). डॉक्टरांच्या मते, गर्भधारणेदरम्यान आणि विशेषतः प्रसूतीनंतर डीव्हीटी होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

अनेकदा महिला पायातील सूज किंवा वेदना सामान्य थकवा समजून त्याकडे दुर्लक्ष करतात, पण हीच छोटीशी गोष्ट पुढे जाऊन फुफ्फुसातील रक्त गोठणे (Pulmonary Embolism) किंवा स्ट्रोक सारख्या जीवघेण्या आजारांना आमंत्रण देऊ शकते! म्हणून, वेळीच लक्षणांवर लक्ष देणे आणि योग्य उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला, या गंभीर समस्येची कारणे, लक्षणे आणि बचावाचे उपाय तज्ज्ञांकडून सविस्तर जाणून घेऊया.
डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजे काय?
डीव्हीटी ही अशी स्थिती आहे, ज्यात शरीरातील खोलवर असलेल्या नसांमध्ये रक्ताची गाठ तयार होते. हे सामान्यतः पायांमध्ये घडते आणि यामुळे पायात तीव्र वेदना, सूज आणि इतर समस्या सुरू होतात. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे, ही रक्ताची गाठ रक्ताभिसरण मार्फत फुफ्फुसे किंवा मेंदूपर्यंत पोहोचू शकते आणि पल्मोनरी एम्बोलिज्म किंवा स्ट्रोकसारख्या जीवघेण्या परिस्थितीस कारणीभूत ठरू शकते.
गरोदरपणात डीव्हीटीची कारणे
गर्भधारणेदरम्यान शरीरात होणारे खालील बदल डीव्हीटीचा धोका वाढवतात.
रक्ताची वाढलेली घनता: गर्भधारणेमुळे रक्त थोडे अधिक घट्ट होते.
रक्ताचा मंद प्रवाह: वाढत्या गर्भाशयामुळे पायाच्या नसांवर दबाव येतो, ज्यामुळे पायांमधील रक्तप्रवाह संथ होतो.
दीर्घकाळ बसून राहणे: जास्त वेळ बसून राहणे किंवा डॉक्टरांनी सांगितलेला बेड रेस्ट.
शरीरातील पाण्याची कमतरता: डिहायड्रेशनमुळे रक्ताची गाठ होण्याची शक्यता वाढते.
जास्त वजन किंवा स्थूलता
- सीझेरियन प्रसूती
- पूर्वी डीव्हीटीचा त्रास झालेला असणे.
- डीव्हीटीची प्रमुख लक्षणे
- डीव्हीटीची ही लक्षणे कधीही दुर्लक्षित करू नका:
- पायांमध्ये अचानक किंवा तीव्र सूज येणे.
- नसांमध्ये वेदना होणे.
- पोटरी किंवा मांडीत तीव्र वेदना जाणवणे.
- पाय जड झाल्यासारखे वाटणे.
- त्वचा लालसर किंवा गरम होणे.
- चालताना वेदना वाढणे.
डीव्हीटीपासून बचावाचे सोपे उपाय
प्रसूतीनंतर आणि गरोदरपणात डीव्हीटीपासून बचाव करण्यासाठी खालील उपाय अमलात आणा.
हलका व्यायाम: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलकी चाल किंवा प्रीनेटल व्यायाम नियमित करा.
सातत्याने हालचाल: एकाच ठिकाणी दीर्घकाळ बसून राहू नका. दर १ तासाने पाय स्ट्रेच करा किंवा थोडे फिरा.
हायड्रेशन: भरपूर पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास डीव्हीटीचा धोका वाढतो.
डॉक्टरांचा सल्ला: डॉक्टरांनी सांगितल्यास 'कंप्रेशन स्टॉकिंग्ज' वापरा.
जागरूकता: पायात कोणतीही अनपेक्षित सूज, वेदना किंवा लालसरपणा दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.












Click it and Unblock the Notifications