Diwali 2025 :फटाक्यांच्या धुरामुळे लहान मुलांचे फुफ्फुस धोक्यात! पालकांनी कशी घ्यावी काळजी? हे वाचाच
Diwali firecracker smoke health risks : दिवाळीचा सण म्हणजे रोषणाई, दिव्यांची आरास आणि उत्साहाचे वातावरण. पण या आनंदाच्या सणात वाजवले जाणारे रंगीबेरंगी फटाके आणि त्यांचा धूर आपल्या चिमुकल्यांसाठी मोठा धोका घेऊन येतो.
फटाक्यांमुळे हवेत पसरणारे विषारी वायू, धूळ आणि सूक्ष्म कण लहान मुलांच्या नाजूक फुफ्फुसांना गंभीर नुकसान पोहोचवू शकतात. लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास, ॲलर्जी आणि श्वसनाचे आजार होण्याचा धोका कसा असतो आणि यापासून बचाव करण्यासाठी पालकांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबद्दल जाणून घेऊया.

फटाक्यांचा धूर मुलांच्या फुफ्फुसांना कसा पोहोचवतो नुकसान?
फटाके फुटल्यानंतर हवेत सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड आणि PM2.5 (सूक्ष्म हानिकारक कण) सारखे विषारी कण पसरतात. डॉ. अक्षय मेहता, ज्येष्ठ सल्लागार नवजात शिशु व बालरोग विशेषज्ञ (मदरहूड हॉस्पिटल, ग्रेटर नोएडा) यांच्या मते, हे कण हवेत बराच काळ तरंगत राहतात आणि मुले श्वासाद्वारे ते शरीरात घेतात.
फटाक्यामुळे मुलांमध्ये खालील आरोग्य समस्या उद्भवू शकतात
श्वसनाचे विकार: श्वास घेण्यास अडचण, सततचा खोकला, घरघर लागणे आणि घसा खवखवणे.
तीव्र आजार: सततच्या प्रदूषणामुळे मुलांना दमा किंवा ब्राँकायटिस सारखे आजार होऊ शकतात.
फुफ्फुसांची क्षमता कमी: वारंवार प्रदूषणाच्या संपर्कात आल्यास फुफ्फुसांची ताकद कमी होते आणि दीर्घकाळ चालणाऱ्या श्वसन समस्यांचा धोका वाढतो.
लहान मुलांवर अधिक परिणाम: ५ वर्षांखालील मुलांचे फुफ्फुस अत्यंत नाजूक असल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते.
मुलांना फटाक्यांच्या धुरापासून वाचवण्याचे सोपे उपाय
पालकांनी थोडीशी काळजी घेतल्यास मुलांना फटाक्यांच्या धुरामुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवता येते.
बाहेर जाणे टाळा : ज्यावेळी हवेतील प्रदूषण जास्त असते (विशेषतः संध्याकाळी), तेव्हा मुलांना घराबाहेर घेऊन जाणे टाळा.
मास्कचा वापर आणि खिडक्या बंद : मुलांना बाहेर जाताना मास्क घाला आणि घरातील खिडक्या व दरवाजे बंद ठेवा, जेणेकरून विषारी हवा घरात येणार नाही.
सुरक्षित उत्सव : फटाक्यांऐवजी पणत्या, दिवे, रोषणाई, संगीत आणि स्वादिष्ट मिठाईने सण साजरा करण्यावर भर द्या. पर्यावरणपूरक फटाक्यांची निवड करा.
जागरूकता: मुलांना फटाके जाळण्याचे आरोग्यावर होणारे हानिकारक परिणाम समजावून सांगा.
आहार आणि पाणी: मुलांना भरपूर पाणी पिण्यास द्या. त्यांच्या आहारात संत्री आणि पेरू सारखी व्हिटॅमिन सी असलेली फळे समाविष्ट करा, जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल.
वैद्यकीय सल्ला: जर मुलाला खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा घरघर याची तक्रार असेल, तर विलंब न करता त्वरित डॉक्टरांना दाखवा.
(Disclaimer): या लेखातील माहिती केवळ सामान्य माहिती आणि शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. ही कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला किंवा उपचाराचा पर्याय नाही. कोणत्याही आरोग्य समस्येसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा किंवा पात्र आरोग्य सल्लागाराचा सल्ला घ्यावा.












Click it and Unblock the Notifications