Fact Check : झुरळाचे दूध गाय किंवा म्हशीच्या दुधापेक्षा आरोग्यदायी आहे का?
सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून एक विचित्र पोस्ट व्हायरल होत आहे. झुरळाचे दूध गाय किंवा म्हशीच्या दुधापेक्षा जास्त आरोग्यदायी आणि पोषक तत्वांनी भरलेले असते, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या बातमीने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. पण झुरळाचे दूध खरोखरच मानवांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर आहे का? या व्हायरल दाव्याची सत्यता तपासून घेऊया.
झुरळाचे दूध हे प्रथिनांनी समृद्ध असलेले स्फटिकासारखे पदार्थ आहे जे डिप्लोप्टेरा पंक्टाटा या विशिष्ट झुरळ प्रजातीद्वारे तयार केले जाते. ही प्रजाती इतरांपेक्षा वेगळी आहे. कारण ती अंडी देण्याऐवजी जिवंत पिल्लांना जन्म देते. या काळात मादी झुरळ तिच्या गर्भाचे पोषण करण्यासाठी दुधासारखे पदार्थ तयार करते, ज्यामध्ये प्रथिने, कर्बोदके, चरबी आणि नऊ आवश्यक अमीनो आम्ल असतात.
झुरळाचे दूध जास्त पौष्टिक आहे का?
संशोधकांच्या मते, झुरळाचे दूध गाय, म्हशी आणि अगदी मानवी दुधापेक्षाही जास्त पौष्टिक असू शकते. प्रयोगशाळेतील अभ्यासात असे आढळून आले की त्यात गाईच्या दुधापेक्षा तीन पट जास्त पोषक घटक असतात. त्यात सुमारे 45% प्रथिने, 25% कर्बोदके आणि 16-22% चरबी, तसेच ओमेगा-3 फॅटी अॅसिड, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

झुरळाचे दूध मानवासाठी सुरक्षित आहे का?
अर्थात ते पौष्टिक मूल्यांनी परिपूर्ण असू शकते परंतु झुरळांपासून दूध काढणे सध्या व्यावहारिक नाही. कारण त्यासाठी जटिल प्रक्रियांची आवश्यकता असेल. असे असूनही त्यातून खूप कमी दूध बाहेर येईल. अशा परिस्थितीत झुरळांपासून मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन करणे सध्या व्यावहारिक नाही.
शास्त्रज्ञांनी सांगितले की झुरळाच्या आतड्यात दुधासारखा पदार्थ तयार होतो. यासाठी झुरळांना मारावे लागेल आणि 100 ग्रॅम दूध काढण्यासाठी सुमारे 1000 मादी झुरळे मारावी लागतील. तथापि झुरळांपासून दूध काढण्याची कल्पना निश्चितच मनोरंजक आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे नजीकच्या भविष्यात ते मुख्य दूध म्हणून वापरले जाऊ शकते अशी शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications